Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, पुढील सुनावणी कधी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:47 IST2025-05-21T16:47:07+5:302025-05-21T16:47:29+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या झालेल्या घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराचा सरतपास सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि ...

Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, पुढील सुनावणी कधी.. वाचा
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या झालेल्या घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराचा सरतपास सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी मंगळवारी नोंदविला. पानसरे हत्येचा खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्या कोर्टासमोर सुरू आहे. साक्षीदाराचा सरतपास आज पूर्ण करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी ११ जूनला होईल. त्यावेळी उलटतपास होणार आहे.
अॅड. राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी साक्षीदाराची मुलांना शाळेत सोडण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच फटाके फुटल्यासारखा आवाज त्यांना जाणवला. त्यांनी घराबाहेर पाहिले असता एक पुरुष आणि महिला रस्त्यावर कोसळल्याचे दिसले.
साक्षीदाराने खाली येऊन पाहिले असता जखमी गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा असून त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजले. त्यांनी वडिलांना याची माहिती देऊन रुग्णवाहिका मागवली होती. या सर्व घटनेची माहिती फिर्यादी मुकुंद कदम आणि पानसरे कुटुंबीयांना दिली. तसेच त्यांनी खासगी वाहनांतून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. साक्षीदार हे पानसरे यांच्या घरापासून काही अंतरावरच राहण्यास आहेत. त्यांच्याच दारात हा प्रकार घडल्याची साक्ष त्यांनी न्यायालयात दिली.