Kolhapur Politics: कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:47 IST2025-11-17T13:45:26+5:302025-11-17T13:47:20+5:30
Local Body Election: चर्चा अंतिम टप्प्यात : मंडलिक विरोधात लढणार

Kolhapur Politics: कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येणार?
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज, सोमवारी शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यानच कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दुपारी तीन वाजता अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडुन निवडणुक न लढता राजर्षी शाहु आघाडी मार्फत निवडणुक लढतील असेही समजते. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असणार आहे. मात्र शाहू आघाडीच्यावतीने घाटगे यांचे समर्थक जयवंत रावण यांच्या मातोश्री उषा बाळकृष्ण रावण यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने युतीबाबत सस्पेन्स वाढला आहे.
या घडामोडीमुळे भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज माघार घेतले आहेत. हा निर्णय देखील भाजपाच्या वरीष्ठ पातळीवर झाला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक हे कागलमधाये स्वतंत्र पॅनेल करणार आहेत. असे असले तरी अंतिम क्षणी काहीही घडण्याची शक्यता असल्याने कागल शहरासह जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.