Kolhapur Politics: मंडलिकांच्या टीकेकडे लक्ष देणार नाही - मंत्री मुश्रीफ; अस्वस्थ न होण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:51 IST2025-11-19T15:49:50+5:302025-11-19T15:51:58+5:30
राजेंचं भविष्य माहिती नाही

Kolhapur Politics: मंडलिकांच्या टीकेकडे लक्ष देणार नाही - मंत्री मुश्रीफ; अस्वस्थ न होण्याचा दिला सल्ला
कोल्हापूर : लोकांनी पाठबळ दिल्यास समरजित घाटगे यांच्या सोबत अनादी काळापर्यंत युती राहील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी (दि. १८) केली. कागल तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष सोडून समरजित घाटगे यांचा हातात हात घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घाटगे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
मुश्रीफ म्हणाले, आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. का एकत्र आलो आहोत हे घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. आघाडी झाली आहे म्हणजे आता मताधिक्यासाठी सर्वांना काम करावे लागणार आहे. यामुळे काही जणांवर अन्याय होणार आहे. मध्ये साडेचार वर्षे कोणी नगरसेवक नव्हते. परंतु तेव्हाही मी आणि घाटगे यांना कार्यकर्त्यांना जपलं आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
ते म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा न करता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याबद्दल आम्ही दोघांनीही माफी मागितली आहे. लोकांनी पाठबळ दिले तर अनादी काळापर्यंत ही युती राहील. संजय मंडलिक यांनी आमच्या युतीबद्दल अस्वस्थ होण्याची गरज नाही. याआधी शामराव भिवाजी पाटील- सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे-सदाशिवराव मंडलिक, मी - संजयबाबा घाटगे अशा अनेकदा विरोधी नेत्यांनी युती केल्या आहेत. सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष घडवणे हे कागल तालुक्यातील नेत्यांना मान्य नाही. जोपर्यंत नेते, कार्यकर्ते एकत्र आहोत तोपर्यंत युती राहील.
पत्रकार परिषदेला युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, अमरसिंह घोरपडे, एम. पी. पाटील, अखिलेशसिंह घाटगे, प्रताप ऊर्फ भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रा. सुनील मगदूम, शीतल फराकटे, सविता प्रताप माने, तस्लिमा राजेखान जमादार, विकास पाटील यांच्यासह मुश्रीफ, घाटगे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडलिकांच्या टीकेकडे लक्ष देणार नाही
जर आम्ही लोकसभेला मंडलिक यांना पाठबळ दिले नसते तर त्यांना कागलमधून इतके मताधिक्य मिळालेच नसते. मुरगुडमध्ये आम्ही एकत्र येणे शक्य नव्हते आणि कागलमध्ये त्यांचा फार कधी सहभाग नव्हता. त्यामुळे मंडलिक यांच्या टीकेकडे लक्ष देणार नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
अजूनही तरी गडहिंग्लजला पाठिंबा दिला नाही
गडहिंग्लजला घाटगे यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे अशी विचारणा करता मुश्रीफ म्हणाले, त्यांच्या तिथे काही अडचणी आहेत. अजून तरी त्यांनी मला पाठिंबा दिलेला नाही.
राजेंचं भविष्य माहिती नाही
राजेंचे भविष्य मला माहिती नाही. ते खासदार होणार की आमदार होणार हे त्यांचे वरिष्ठ सांगतील. परंतु भैया माने आमदार व्हावेत ही माझी इच्छा आहे. सर्वात जास्त पदवीधरची ९१ हजार नोंदणी कागल तालुक्यातून झाली आहे.
आज अंबरिश, संजयबाबांशी बोलणार
या सर्व गडबडीत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मला संजयबाबा घाटगे यांच्याशी बोलता आले नाही. बुधवारी अंबरिश आणि त्यांच्याशी मी बाेलणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
माझी काही अडचण नव्हती
तुम्ही कॅबिनेट मंत्री आणि सर्व सत्तास्थाने तुमच्याकडे असताना तुमची अशी काय अडचण होती म्हणून तुम्ही युतीसाठी तयार झालात अशी मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, माझी काही अडचण नाही. फक्त विकासासाठी हा निर्णय घेतला.