दिव्यांगांचे रखडलेले साहित्य आठ दिवसांत वाटप करणार : जिल्हा परिषदेची यंत्रणाही हलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:39 AM2020-02-01T11:39:49+5:302020-02-01T11:40:38+5:30

समीर देशपांडे  कोल्हापूर : केवळ केंद्रीय मंत्र्यांची तारीख मिळत नाही म्हणून सात महिने दिव्यांगांच्या साहित्याचे वितरण होत नाही, ही ...

Will distribute handcrafted literature in eight days | दिव्यांगांचे रखडलेले साहित्य आठ दिवसांत वाटप करणार : जिल्हा परिषदेची यंत्रणाही हलली

दिव्यांगांचे रखडलेले साहित्य आठ दिवसांत वाटप करणार : जिल्हा परिषदेची यंत्रणाही हलली

Next
ठळक मुद्देसतेज पाटील-मुश्रीफ-बच्चू कडू --लोकमत इफेक्ट

समीर देशपांडे 

कोल्हापूर : केवळ केंद्रीय मंत्र्यांची तारीख मिळत नाही म्हणून सात महिने दिव्यांगांच्या साहित्याचे वितरण होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. जर आठ दिवसांत याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तारीख दिली नाही तर आम्ही खासदारांना घेऊन दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे साहित्य वितरित करू, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला.

कोल्हापूरजिल्हा परिषदेने गतवर्षी ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविले. नोंदणी, तपासणी करून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या अल्मिको कंपनीने १५ हजार ६९५ दिव्यांगांसाठी नऊ कोटी १३ लाख रुपयांचे साहित्य तयार करण्यासही सुरुवात केली. ६ जुलै २०१९ रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे साहित्य वितरण करण्याचे निश्चित झाल्याने तीन कोटी रुपयांचे साहित्यही कोल्हापूरला पाठवून दिले. परंतु तो कार्यक्रम रद्द झाला आणि गेले सात महिने हे साहित्य पडून राहिले आहे.

‘लोकमत’ने शुक्रवारी ही वस्तुस्थिती मांडल्यानंतर मात्र याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘सात महिने केवळ तारीख मिळत नाही म्हणून दिव्यांगांना देण्याचे साहित्य थांबवणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे. जर आठ दिवसांत याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तारीख दिली नाही तर आम्ही खासदारांना सोबत घेऊन या साहित्याचे वितरण करणार आहोत.’
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवारी नाशिकमध्ये होते. त्यांना ही माहिती मिळताच तातडीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला.

पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आडसूळ आणि मुश्रीफ यांचेही बोलणे झाले. हसन मुश्रीफ म्हणाले, ‘केंद्रीय मंत्र्यांच्या तारखेसाठी महिनभार वाट पाहणे आम्ही राजकीय नेते म्हणून समजू शकतो. मात्र सात महिने हे साहित्य गोदामामध्ये पडून आहे आणि ते दिव्यांगांना मिळू शकत नाही, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आम्हीच त्या साहित्याचे वाटप करणार आहोत.’

दिव्यांगांसाठीच्या प्रश्नांवर आक्रमक असलेल्या जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा विषय समजल्यानंतर थेट फोनवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधला. आठ दिवसांत जर या साहित्याचे वाटप झाले नाही तर मी स्वत: कोल्हापुरात येऊन हे साहित्य वाटणार असल्याचे त्यांनी मित्तल यांना सांगितले.

खासदार मंडलिक यांनी मागविली माहिती
‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीतही ही बातमी प्रसिद्ध झाल्याने दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गेलेल्या खासदार संजय मंडलिक यांनी या बातमीची तातडीने दखल घेतली. त्यांनी शुक्रवारी दुपारीच आपल्या कोल्हापूर येथील स्वीय साहाय्यकांना जिल्हा परिषदेत पाठवून या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्र्यांशी केलेल्या सर्व पत्रव्यवहाराच्या झेरॉक्स प्रती घेतल्या. दोन दिवसांत आपण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन त्यांची तारीख घेणार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

आता नव्याने पत्रव्यवहार
पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ आणि बच्चू कडू या तिघांनीही या प्रकरणी दखल घेतल्याने शुक्रवारी संध्याकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना पुन्हा नव्याने शनिवारी या मंत्र्यांच्या संदर्भासह तारीख घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या.

आठवले यांनी दिली होती तारीख
दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शनिवार, दि. १८ जानेवारी २०२० ही या साहित्य वितरण समारंभासाठी तारीख दिली होती, अशी माहिती आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष उत्तम कांबळे आणि प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली. ते म्हणाले, आमच्यादेखत ३० डिसेंबरला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर या कार्यक्रमासाठी १८ जानेवारी ही तारीख दिली होती. मात्र याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली न झाल्याने हा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे आठवले यांनी तारीख दिली नाही, असे म्हणणे बरोबर नाही.

 

Web Title: Will distribute handcrafted literature in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.