पुणे-कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची केंद्राकडे मागणी करणार : मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:27 IST2025-11-04T15:26:47+5:302025-11-04T15:27:59+5:30
पुणे-कोल्हापूर महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू

पुणे-कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची केंद्राकडे मागणी करणार : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम ३१ जानेवारीअखेर पूर्ण व दर्जेदार झाले नाही तर या महामार्गावरील टोल रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
पुणे-कोल्हापूर महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. संथ काम त्यात पाऊस, ठिकठिकाणी वळणे, कराड येथे उड्डाणपुलाचे काम, उकरलेले रस्ते, खडी-मुरुम अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. त्यात दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर पुणे-मुंबईला परत निघालेल्या वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे तब्बल १२ ते १३ तास महामार्गावर अडकून बसावे लागले. त्यामुळे प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. 
तासनतास अडकून पडल्याने जेवणापासून ते प्राथमिक गरजांपर्यंत सगळ्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागला. या वास्तवावर लोकमतमध्ये सलग दोन दिवस परखडपणे बातम्या प्रसिद्ध झाल्या. परिणामी सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी या विषयावर बैठक घेऊन तीन महिन्यांनी टोल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सातारा कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले असून, त्यांची दुरुस्ती तातडीने करावी. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सुचवले.