कोल्हापूरजवळ आढळला पांढऱ्या रंगाचा पाईबाल्ड कोब्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:24 IST2025-08-19T17:23:20+5:302025-08-19T17:24:16+5:30
कोल्हापूर : वारणानगरजवळच्या अमृतनगर परिसरातील रहिवासी प्रथमेश कुंभार यांना गेल्या सोमवारी एका मळ्यात एक अनोखा आणि ओबडधोबड नक्षी असलेला ...

कोल्हापूरजवळ आढळला पांढऱ्या रंगाचा पाईबाल्ड कोब्रा
कोल्हापूर : वारणानगरजवळच्या अमृतनगर परिसरातील रहिवासी प्रथमेश कुंभार यांना गेल्या सोमवारी एका मळ्यात एक अनोखा आणि ओबडधोबड नक्षी असलेला अंशत: पांढऱ्या रंगाचा कोब्रा आढळला.
कोब्रा अनेक रंगात आढळतात, परंतु पांढऱ्या रंगाचे कोब्रा आढळत नाहीत. त्यामुळे ते अत्यंत दुर्मीळ मानले जातात. या कोब्राच्या शरीरावरील नक्षी थोडी अनोखी असल्याचे त्यांना जाणवली. सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, या कोब्रास सुरक्षितरीत्या पकडले.
त्यांनी अधिक माहितीसाठी सोलापूरचे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे आणि वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांना या कोब्राची छायाचित्रे पाठविली. त्याचे परीक्षण केल्यावर त्याच्या शरीरावर असामान्य पांढऱ्या ठिपक्यांचे डिझाइन दिसून आले. यावरून हा कोब्रा काही प्रमाणात पाईबाल्ड असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या निरीक्षणानंतर त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शास्त्रीय भाषेत पाईबाल्ड मॉर्फिझम म्हणजे जनुकात्मक बदल असा असून, त्यामध्ये प्राण्याच्या त्वचेवर किंवा खवलेवर रंगद्रव्याच्या (पिग्मेंट) असमान विभागणीमुळे पांढरे डाग, धब्बे किंवा पट्टे दिसतात. त्यामुळे अशा सापांची नैसर्गिक रचना नेहमीपेक्षा भिन्न आणि आकर्षक दिसते. अशा प्रकारचा नाग आढळणे ही दुर्मीळ घटना मानली जाते. - राहुल शिंदे, वन्यजीव अभ्यासक.