अंबाबाई विकास आराखड्यात मंदिर जतन संवर्धन कुठे आहे ?, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:46 IST2025-04-29T11:45:50+5:302025-04-29T11:46:46+5:30
सुधारणा करून आराखडा सादर करण्याची सूचना

अंबाबाई विकास आराखड्यात मंदिर जतन संवर्धन कुठे आहे ?, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल
कोल्हापूर : अंबाबाई विकास आराखड्यात फक्त बाह्य सुधारणांना महत्त्व दिले गेले आहे. मंदिराचे मूळ दगडी बांधकाम, त्यावरील शिल्पांची झालेली दुरवस्था, पावसाळ्यातील मंदिर गळती, सुटलेल्या शिळा, दगडांची अडत यापैकी कशाचाच विचार केलेला दिसत नाही. सर्वात आधी मूळ मंदिराच्या जतन संवर्धनाला प्राधान्य देऊन त्याचा समावेश आराखड्यात करा. या सुधारणेनंतरच आराखडा शिखर समितीकडे सादर करा, अशी सूचना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अंबाबाई, जोतिबा विकास आराखड्याच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अमल महाडिक, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी विजय भोपळे, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, महेश जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मिसाळ म्हणाल्या, आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या संवर्धनाच्या कामांचा समावेश करा. मंदिरावर ६४ योगिनी आणि अन्य शिल्पे असून, त्यातील काही शिल्पे फुटलेली आहेत. या सुधारणांसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी लागेल. त्याचा प्रस्ताव करून तो पुरातत्व विभागाला पाठवावा. त्यांचे तज्ज्ञ बोलावून त्यांच्या माध्यमातून मंदिराची पाहणी करा. त्यांना आपले अभियंते द्या. मंदिराचा दुसरा टप्पा हा मंदिराच्या आवारातील वास्तूंच्या संवर्धनाचा असला पाहिजे.
आमदार अमल महाडिक यांनी मंदिर बाह्य परिसरात अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली, तर जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधी देता येईल, असे सांगितले.
शासकीय जागांचा विचार करा
अंबाबाई आराखड्यासाठी भूसंपादन करताना कपिलतीर्थ मार्केट, पागा इमारत, शेतकरी संघ, विद्यापीठ हायस्कूल यासह शासकीय जागा संपादन करून तेथे सुविधा उपलब्ध करून देता येतात याचा विचार करायचे मंत्री मिसाळ यांनी सुचवले.
जोतिबावर वृक्षारोपण करा
जोतिबा आराखड्याबाबत मिसाळ म्हणाल्या, जोतिबा परिसर प्लास्टिकमुक्त करा. डोंगरावर अधिकाधिक वृक्षारोपण करा. नारळ फोडण्यासाठी, अगरबत्ती कापूर लावण्याची जागा याचेही नियोजन आराखड्यात करा. स्वच्छतागृहांची संख्या वाढवा, फूड प्लाझा बनवा.