कोल्हापूर : कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधेमुळे दगावलेल्या भावंडांना नेमकी कशातून विषबाधा झाली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मुदत संपलेल्या केकमधून विषबाधा झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. पण, अन्न व औषध प्रशासनाने केकचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. दोघांच्या पोटात तणनाशकाचे अंश मिळाले नाहीत, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमकी कशातून विषबाधा झाली, याचे उत्तर व्हिसेरा आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातूनच मिळणार आहे.एक डिसेंबरला जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे श्रीयांश आणि काव्या आंगज या भावंडांचा उपचारादरम्यान तीन डिसेंबरला मृत्यू झाला. सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेल्या कपकेकमधून विषबाधा झाली असावी, अशी चर्चा सुरुवातीला होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंगज यांच्या घरात जाऊन कपकेकच्या पाकिटाचा कागद ताब्यात घेतला.संबंधित केक तयार केलेल्या बेकरीत जाऊन चौकशी केली. त्याच बॅचमधील विक्री झालेल्या इतर पाकिटांचा शोध घेऊन तपासणी केली. त्याची मुदतही संपलेली नव्हती. तसेच केक खाल्लेल्या इतर कुणालाही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आंगज भावंडांना कपकेकमुळे विषबाधा झाली नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. कपकेक हे विषबाधेचे कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता अन्य कारणांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.मुलांनी काय खाल्ले होते?एक ते तीन डिसेंबरला मुलांनी घरात चपाती, भाकरी, मटण, आंबोळी, दूध, कपकेक, झुणका-भाकरी, भात असे पदार्थ खाल्ले होते. दोन तारखेला सकाळी मुलाला त्रास होऊ लागला. गावातील डॉक्टरांनी त्याला औषधे देऊन घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि मुलीलाही त्रास सुरू झाला. दरम्यान, त्यांच्या आईलाही थोडासा त्रास झाला. बाहेरून कोणत्याही प्रकारचे विष त्यांच्या पोटात गेले नसेल तर भिन्न प्रकृतीच्या खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या पोटात विष तयार झाले असावे काय? याला उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे.
निदान होण्यास विलंबश्रीयांश याला त्रास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडे उपचार घेतले. त्यांनी मुलाच्या खाण्या-पिण्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवले असते, तर कदाचित वेळेत निदान आणि उपचार होऊ शकले असते. काव्याला त्रास होत असताना श्रीयांशला आणलेले तेच औषध तिलाही दिले गेले. त्यामुळे दोघांनाही वेळेत आणि आवश्यक उपचार मिळाले नाहीत, असा पोलिसांचा अंदाज आहे.अहवालांची प्रतीक्षाश्रीयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. श्रीयांशसह काव्याचाही व्हिसेरा राखीव ठेवला आहे. दोघांच्याही पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. १० ते १२ दिवसांत दोन्ही अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच विषबाधेचा उलगडा होईल, अशी माहिती मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली.