Satej Patil: संभाजीराजेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच - पालकमंत्री सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:03 IST2022-05-02T21:03:19+5:302022-05-02T21:03:51+5:30
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे हे राजे आहेत. राजांनी आपल्या पक्षात यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ते काँग्रेसमध्ये आले तर ...

Satej Patil: संभाजीराजेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच - पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे हे राजे आहेत. राजांनी आपल्या पक्षात यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले. मात्र, खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर संभाजीराजे भाजपत प्रवेश करणार, सेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
खासदार संभाजीराजे यांनी ३ मे रोजी आपली पुढील राजकीय भूमिका मांडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, खासदार संभाजीराजे यांनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. त्यांचा अवधी संपायला अजून अवकाश आहे, त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतीलच; पण ते आमच्या पक्षात आले तर भाग्यच असेलही ते म्हणाले.
मालोजीराजे पुन्हा सक्रिय
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोल्हापूरची राजकीय समिकरणे बदलणार आहेत. मालोजीराजेंनी आमदार जयश्री जाधव यांच्या विजयासाठी घेतलेला पुढाकार महत्वपुर्ण होता.
शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंचा काढला होता चिमटा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाहू छत्रपती यांनी खासदार संभाजीराजे यांचा चिमटा काढला होता. ते म्हणाले होते, आपण शाहूंचे कार्य देशात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्ण मांडता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जरा लवकर कळलं असतं तर बरं झालं असतं. उशिरा का होईना केंद्रातील नेत्यांना शाहू समजायला लागतील ही चांगली गोष्ट आहे. शाहू महाराजांच्या या कृतज्ञता पर्वाचा डंका पार नागपूरपर्यंत पोहोचला पाहिजे.