कलबुर्गी सुरू; कोल्हापूर-बिहार रेल्वे केव्हा?
By संदीप आडनाईक | Updated: October 7, 2025 13:11 IST2025-10-07T13:05:48+5:302025-10-07T13:11:31+5:30
बिहारला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : दिवाळीची प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत पुणे, मुंबई, कलबुर्गीसह बिहारसाठी कोल्हापुरातून विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यातील पुणे, मुंबई आणि कलबुर्गीसाठी साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाली. मात्र, सर्वाधिक गर्दी असणाऱ्या बिहारसाठी घोषणा केलेली कटिहार एक्स्प्रेसचे वेळापत्रक मात्र अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे बिहारला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
दिवाळी आणि छठपूजेदरम्यान सणासुदीच्या गर्दीच्या काळात, तिकिटांची मागणी वाढत असल्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील असून कलबुर्गी एक्स्प्रेस शुक्रवार वगळता रोज धावते आहे. कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून १४ सप्टेंबरपासून (गाडी क्र. ०१४०५) ३० नोव्हेंबरपर्यंत ही कटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस विशेष साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ९:३५ वाजता बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार होती. मात्र, ही गाडी अद्याप सुरूच झालेली नाही.
रेल्वेने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कोल्हापुरातून ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कटिहारला पोहोचणार आहे. या कालावधीत (क्र. ०१४०६) ही गाडी दर मंगळवारी परतीचा प्रवास सुरू करेल. मंगळवारी सायंकाळी ६:१० वाजता कटिहार स्थानकावरून निघून ही गाडी गुरुवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या १४ फेऱ्या होणार असून या गाडीला ६ जनरल, ६ आरक्षित, ४ वातानुकूलित आणि दोन गार्ड व्हॅन असे १८ डबे आहेत.
मुंबईसाठी दर बुधवारी गाडी
दरम्यान, कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून २४ सप्टेंबरपासून (गाडी क्र. ०१४१७) कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स-कोल्हापूर ही विशेष एक्स्प्रेस प्रत्येक बुधवारी रात्री १० वाजता मुंबईकडे रवाना होते आणि हीच गाडी (क्रमांक ०१४१८) दुसऱ्या दिवशी ५ वाजता मुंबईत पोहोचते. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज असे थांबे असल्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद आहे. या गाडीच्या २६ नोव्हेंबरपर्यंत १० फेऱ्या होणार आहेत. तीन एसी-थ्री टियर, १० स्लीपर क्लास, १ एसी कोच, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी २० डब्यांची रचना आहे.