Kolhapur: आमच्याकडे सव्वा लाख लिटर दूध; ‘गोकुळ’ला परिणाम भोगावे लागतील, ११०८ दूध संस्थांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:02 IST2026-03-30T16:00:03+5:302026-03-30T16:02:15+5:30
अदृश्य शक्तीच्या दबावापोटी मतदानाचा अधिकार डावलाल तर याद राखा, बेलवाडेंच्या मागील अदृश्य शक्ती कोण?

Kolhapur: आमच्याकडे सव्वा लाख लिटर दूध; ‘गोकुळ’ला परिणाम भोगावे लागतील, ११०८ दूध संस्थांचा इशारा
कोल्हापूर : पाणीसुद्धा तिन्ही ऋतूमध्ये कमी अधिक होत असते, हे तर दूध आहे. वाड्यावस्त्यांवर उन्हाळा, पावसाळ्यात दुभती जनावरे सांभाळताना कसरत करावी लागत असल्याने वर्षभर एकसारखे संकलन राहूच शकत नाही. आतापर्यंत संघाच्या दोन-तीन निवडणुकीत मतदान केले आहे, आता राजकीय द्वेषातून कोणीतरी अदृश्य शक्तीच्या दबावापोटी आमचा मतदानाचा अधिकार काढून घ्याल तर याद राखा, असा सज्जड इशारा दुग्ध विभागाला देत, ११०८ दूध संस्थांचे प्रतिदिनी १ लाख २५ हजार लिटर दूध संकलन असून ‘गोकुळ’ आमच्या मागे राहिले नाहीतर इतर ‘अमूल’सह इतर दूध संघाचे पर्याय आम्हाला आहेत. त्याचे परिणाम ‘गोकुळ’ला भोगावे लागतील, असेही संस्था प्रतिनिधींनी ठणकावून सांगितले.
दुग्ध विभागाने ११०८ संस्थांना अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढले आहेत. यावरून, या संस्था आक्रमक झाल्या असून रविवारी त्यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांची भेट घेतली. विद्याधर कुलकर्णी (अब्दुललाट) म्हणाले, आमच्या संस्थेची स्थापना १९८४ ची आहे तरीही अवसायनात काढली आहे. आता सुनावणी घेणार असले तरी दीर्घकाळ प्रक्रिया असल्याने तालुकानिहाय सुनावणी घेण्यासाठी संघाने पुढाकार घ्यावा.
विलास पोवार (सिद्धनेर्ली) म्हणाले, संस्था उभा करणे एवढे सोपे नाही. तक्रार करणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. दोनवेळा लेखापरीक्षण व निवडणुका झाल्या, दूध सुरळीत असताना आमच्यावर कारवाई का? संचालक आमच्या पाठीशी राहणार की नाही? हे सांगा.
विजयराव जाधव (सालपेवाडी) म्हणाले, या संस्थांकडून प्रतिदिनी सव्वा लाख लिटर दूध आहे. या संस्थांच्या मागे ‘गोकुळ’ उभा राहिले नाहीतर इतर दूध संघ आमच्या संपर्कात आहेत. एकीकडे दूध वाढविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत असताना एवढ्या संस्थांना डावलले तर त्याचे परिणाम संघाला भोगावे लागतील.
यावेळी, के. डी. पाटील (कौलव), कृष्णात देवताळे, संभाजी खोत (भुयेवाडी) आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, या संस्थांच्या जिवावरच दूध संघ उभा आहे, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. पण, दूध संस्थांबरोबरच ‘गोकुळ’ला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अदृश्य शक्तीला हाणून पाडले जाईल. सर्व ताकदीनिशी आम्ही संस्थांच्या मागे उभे राहू. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले आदी उपस्थित होते.
‘बोगस’ म्हणून शेतकऱ्यांचा अपमान करू नका
आमचे दूध संकलन कमी असले तरी बोगस नाही. पहाटेपासून शेणामुतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना ‘बोगस’ म्हणणाऱ्यांना जागा दाखवू. असा इशारा संस्था चालकांनी दिला.
बेलवाडेंच्या मागील अदृश्य शक्ती कोण?
संस्था मोठ्या कष्टाने उभ्या केल्या. मागील दोन-तीन निवडणुकीत मतदान केले. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, पण या संस्थाविरोधात तक्रारी प्रकाश बेलवाडे यांच्या मागील अदृश्य शक्ती कोण आहे? हे आम्हाला माहिती आहे, अशा प्रवृत्तीला ‘गोकुळ’मधून हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा युवराज पाटील (बामणी) यांनी दिला.