Kolhapur: विश्वास पाटलांच्या उलटं काम करायला लागतंय; महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘गोकुळ’च्या राजकारणातील उट्टे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:53 IST2026-02-11T11:53:13+5:302026-02-11T11:53:44+5:30
महाडिक यांनी लावलेल्या जोडण्यांची वात ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीपर्यंत धुमसत राहणार

Kolhapur: विश्वास पाटलांच्या उलटं काम करायला लागतंय; महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘गोकुळ’च्या राजकारणातील उट्टे
कोल्हापूर : ‘विश्वास पाटलांच्या उलटं काम तुम्हाला करायला लागतंय’ अशी सूचना करणारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप मंगळवारी दिवसभर जोरदार व्हायरल झाली. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार कसबा बीडचे राजू सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांनीही ‘हर हर महादेव...’ अशी टॅगलाइन देऊन ही क्लिप स्टेट्सला लावली होती.
महाडिक यांनी वाशी (ता. करवीर) येथील एका कार्यकर्त्याला फोन लावल्याचे हे संभाषण आहे. त्यामध्ये महाडिक म्हणतात, बीडचा राजू उभा राहिला आहे आणि आपल्याला विश्वास पाटलाच्या उलटं काम करायचं आहे. राजूला मदत म्हणजे बीडच्या महादेवाला मदत केल्यासारखे आहे. त्याचे मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे. त्याला तो कार्यकर्ताही ‘होय साहेब.. त्यानुसार काम करतो.. तुमचा ‘शब्द’ पडू देत नाही’ असे आश्वासन देतो. तुमचे कुठलीही काम असेल तर कारखान्यावर यायचं. मी सगळी मदत करतो, असेही सांगायला महाडिक विसरत नाहीत.
गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकेकाळी महाडिक यांचे ‘विश्वासू सहकारी’ असलेले विश्वास पाटील गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे संघामध्ये सत्तांतर झाले. आमदार चंद्रदीप नरके यांच्याबद्दलही महाडिक यांचा खुपिरे येथील चर्चेचा व्हिडीओ लोकसभेच्या २०१९ च्या आधी व्हायरल झाला होता. त्याचा निकालावर परिणाम झाला. सचिन पाटील यांच्या विजयासाठी आमदार नरके यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे महाडिक यांनी लावलेल्या जोडण्यांची वात ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीपर्यंत धुमसत राहणार आहे.
सर्व पातळ्यांवर उतरूनही..
चांगला उमेदवार, व्यक्तिगत संपर्क यंत्रणा आणि सर्व पातळ्यांवर उतरूनही सचिन पाटील यांचा पराभव कशामुळे झाला, याची कारणमीमांसा नरके गट व व्यक्तिगत विश्वास पाटील यांच्याकडून सुरू झाली आहे. अगदी पाटील यांचे गाव असलेल्या माळ्याची शिरोली व आजूबाजूच्या गावांतही राजू सूर्यवंशी व काँग्रेसच्या डॉ. के. एन. पाटील यांना चांगली मते मिळाली आहेत. ही नाराजी नेत्यांपर्यंत कशी पोहोचली नाही, याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.