Kolhapur: निपाणी-कागल महामार्गाची वाताहत; पैशाची उधळण, तवंदीचा डोंगरच केला सपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:44 IST2025-02-11T13:42:54+5:302025-02-11T13:44:04+5:30
निपाणी : कागल ते बेळगाव हा सुमारे शंभर किलोमीटरचा चौपदरी महामार्ग सर्वोत्तम म्हणून गणला जात होता. दिल्लीच्या पूंज लॅाईड ...

Kolhapur: निपाणी-कागल महामार्गाची वाताहत; पैशाची उधळण, तवंदीचा डोंगरच केला सपाट
निपाणी : कागल ते बेळगाव हा सुमारे शंभर किलोमीटरचा चौपदरी महामार्ग सर्वोत्तम म्हणून गणला जात होता. दिल्लीच्या पूंज लॅाईड या कंपनीने २००२ मध्ये पूर्ण केलेला रस्ता अनेक वर्षे वापरता आला असता, मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग आठपदरी करण्यासाठी सर्वोत्तम रस्त्याची वाताहत झाली आहे. यासाठी पैशाची प्रचंड उधळण चालू आहे.
नव्याने करण्यात येत असलेल्या महामार्गावर गाव तेथे फ्लायओव्हर करण्याचे ठरविल्याने कागल ते बेळगावपर्यंत पंचवीसहून अधिक ठिकाणी भले मोठे भराव घालून फ्लायओव्हर बांधण्यात येत आहेत. निपाणीजवळ दोन किलोमीटरचा छोटा तवंदी घाट आहे. या घाटात दोन मोठी वळणे होती. त्या ठिकाणी अपघात होतात म्हणून तवंदीचा डोंगरच फोडण्यात येत आहे. याशिवाय निपाणीकडे येण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा खांबावर उभारलेला फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे. यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे.
तवंदी घाटातील दोन वळणे काढली असती तर हा घाट रस्ता विनाअपघात वापरता आला असता. कागल ते निपाणी या पंचवीस किलोमीटर महामार्गावर आठ ठिकाणी प्रचंड मोठा मातीचा भराव टाकून फ्लायओव्हर बांधले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात माती, खडी आणि दगडांचा वापर चालू आहे. काम चालू असल्याने पर्यायी अरुंद मार्गावरुन सध्या वाहतूक चालू आहे. तो रस्ता पर्यायी असल्याने कच्चा आहे. मोठ्या वाहतुकीमुळे सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात पुन्हा गतिरोधक बसविण्यात आले आहे. पंचवीस किलोमीटरमध्ये दोन्ही बाजूचे चाळीस गतिरोधक आहेत.
दहा मिनिटांचा रस्ता
पूंज लॅाईडने केलेल्या रस्त्याने कागलजवळील टोल नाक्यावरून दहा मिनिटात निपाणीला मोटारीने पोहोचता येत होते. या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नाही, असा अनुभव येत असे.
उत्तम सर्व्हिस मार्ग
निपाणी ते कोगनोळी नाक्यापर्यंत महामार्गाला दोन्ही बाजूने उत्तम सर्व्हिस रोड होते. बैलगाड्या, छोटी वाहने, स्थानिक वाहने यावरून ये-जा करीत होती.
गाव तेथे फ्लायओव्हर
निपाणी-कागल मार्गावर सौंदलगा आणि यमगर्णी ही दोनच गावे आहेत; पण आतील दूरवरच्या प्रत्येक गावाकडे वळणाच्या ठिकाणी फ्लायओव्हरच्या भल्या मोठ्या भिंतीच बांधून या भागाचे वाटोळे केले आहे. सौंदलगा गावाला तर दोन मोठे फ्लायओव्हर बांधले गेले आहेत.