चप्पल, बूट काढून आत येण्याची ताकीत; कोल्हापुरातील करवीर पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा अजब नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:39 IST2026-03-17T18:39:06+5:302026-03-17T18:39:26+5:30
ठाणे अंमलदारांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जातात, मात्र..

चप्पल, बूट काढून आत येण्याची ताकीत; कोल्हापुरातील करवीर पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा अजब नियम
कोल्हापूर : नेहमीच तक्रारदारांची वर्दळ असलेल्या करवीर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६) ठाणे अंमलदारांच्या अजब नियमाचा नमुना पाहायला मिळाला. ठाणे अंमलदार सागर उगळे यांनी तक्रारदारांना पोलिस ठाण्याबाहेरच चप्पल, बूट काढून आत येण्याची सक्त ताकीत दिली. चप्पल घालून आत गेलेल्या काही तक्रारदारांना खेकसून त्यांनी बाहेर घालवले. त्यांच्या या अजब नियमाने तक्रारदारांची अडवणूक झाली.
करवीर पोलिस ठाण्यात सोमवारी सागर उगळे हे ठाणे अंमलदार होते. पोलिस ठाण्यात पोहोचणाऱ्या व्यक्तींचा सर्वप्रथम ठाणे अंमलदारांशीच संपर्क येतो. चौकशीपासून ते फिर्याद देण्यापर्यंत सर्वच कामांत पोलिस ठाण्याचा चेहरा समजला जाणारा ठाणे अंमलदार तक्रारदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा असतो. त्याच्या वर्तनावरच एकूण पोलिस दलाच्या वर्तनाचा अंदाज नागरिकांना येतो. त्यामुळे ठाणे अंमलदारांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जातात.
मात्र, करवीर पोलिस ठाण्यातील अंमलदार उगळे यांनी सोमवारी या सूचनांना हरताळ फासून स्वत:चा हेका चालवला. ठाणे अंमलदारांच्या केबिनमध्ये जाणाऱ्या तक्रारदारांना त्यांनी बाहेरच चप्पल, बूट काढायला सांगितले. घाईत काही तक्रारदार चप्पल घालून आत जाताच ते तक्रारदारांवर खेकसले. या प्रकारामुळे तक्रारदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्वत:चा मात्र बुटातच वावर
तक्रारदारांना बूट, चप्पल बाहेर काढायला लावून पोलिस ठाण्यात घेणारे अंमलदार उगळे स्वत: मात्र बूट घालून केबिनमध्ये वावरत होते. याबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रारदारांना उद्धट उत्तरे दिली. यापुढेही नेहमी चप्पल बाहेर काढूनच आत या, अशी दमबाजी त्यांनी केली.