Kolhapur: वारणा धरण परिसर भूकंपाने हादरला, अवघ्या दीड तासातच दोन धक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:57 IST2023-10-17T11:33:29+5:302023-10-17T11:57:04+5:30
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर

Kolhapur: वारणा धरण परिसर भूकंपाने हादरला, अवघ्या दीड तासातच दोन धक्के
शित्तुर वारुण : वारणा धरण परिसरात भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. सोमवारी (दि.१६) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ३.१ तर अवघ्या दीड तासातच आज, मंगळवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी १.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. वारणा सिंचन विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
हे दोन्ही भूकंपाचे धक्के चांदोली परिसरात जाणवले. या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले आहे.
हवामान शास्त्रज्ञ प्रा. जोहरे यांनी केला होता दावा
भूगर्भातील टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह भारतातील विविध भागांत भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे, असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून ‘सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे’ दाखवीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे केला होता.