कोल्हापूर जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का, नवख्यांना अनेक ठिकाणी संधी; नगरपरिषद, पंचायतीमधील राजकारण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:54 IST2025-10-09T11:53:48+5:302025-10-09T11:54:06+5:30
प्रभाग आरक्षण जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का, नवख्यांना अनेक ठिकाणी संधी; नगरपरिषद, पंचायतीमधील राजकारण तापणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगर परिषदा व नगर पंचायतींमधील २६१ जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पडली. आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली आहे, अशा इच्छुकांसाठी काही ठिकाणी संधी निर्माण झाली तर काही जणांचा हिरमोड झाला. प्रस्थापितांना धक्का व नवख्यांना संधी असेही अनेक ठिकाणी झाल्याचे चित्र आहे. निम्म्या म्हणजे १३४ प्रभागांत महिलांचे राज्य असेल. आरक्षण जाहीर झाल्याने नगरपालिका पातळीवरील राजकारण आता तापणार आहे. अनेकांनी जोडण्या लावायला, पैपाहुणे शोधायलाही सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील गडहिंग्लज, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, आजरा, चंदगड, हातकणंगले, वडगाव, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, हुपरी या १३ नगरपालिकांसाठी बुधवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या नगरपालिकांमध्ये चिठ्ठी पद्धतीने प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. गडहिंग्लजमध्ये ११ महिलांना, शिरोळमध्ये १० महिलांना संधी मिळाली आहे. जयसिंगपूरमध्ये १६ जागा तर कुरुंदवाडमध्ये १३ जागा खुल्या झाल्या आहेत.
आजऱ्यात १७ पैकी ९ ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. हातकणंगलेत ४ प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. कागलमध्ये निम्म्या जागांवर महिला आरक्षण पडले आहे. पन्हाळ्यात १० जागांवर महिलाराज असेल. मलकापूर व हुपरीत अनुक्रमे १० व ११ जागा खुल्या झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षणावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा याकडे लागून राहिल्या होत्या. खुल्या झालेल्या प्रभागांमध्ये चुरस जास्त असते. महिला आरक्षण पडले आहे, तिथे आता इच्छुक पुरुष उमेदवारांना पर्याय शोधावा लागणार आहे.
गेल्या दोन-चार वर्षांपासून तयारी केलेल्या काही जणांची संधी आरक्षणामुळे हुकली आहे, अशांना आता अन्य प्रभागांचा पर्याय बघावा लागेल. महिला आरक्षण पडलेल्या ठिकाणी इच्छुकांच्या कुटुंबातील महिलांची वर्णी लागणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक राजकारणातील गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.
कुठले झाले आरक्षण
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला-पुरुष
नगर परिषदा : एकूण ८
जयसिंगपूर : २६ (१३)
गडहिंग्लज : २२ (११)
कागल : २३ (१२)
कुरुंदवाड : २० (१०)
मलकापूर : २० (१०)
वडगाव : २० (१०)
मुरगूड : २० (१०)
पन्हाळा : २० (१०)
नगर पंचायती : एकूण ०५
शिरोळ : २० (१०)
हुपरी : २१ (११)
हातकणंगले : १७ (०९)
चंदगड : १७ (०९)
आजरा : १७ (०९)
एकूण : २६३ (१३४)