युध्दाची झळ.. कोल्हापुरात वसुलीसाठी बँकांची दमछाक; साखर कारखान्यांकडे अडकले कोट्यवधी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:23 IST2026-03-21T19:22:57+5:302026-03-21T19:23:26+5:30
कोल्हापूर : इस्त्राईल-इराण युध्दाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. मार्च अखेर आल्याने बँकांची कर्जाच्या वसुलीची लगबग वाढली आहे. ...

युध्दाची झळ.. कोल्हापुरात वसुलीसाठी बँकांची दमछाक; साखर कारखान्यांकडे अडकले कोट्यवधी रुपये
कोल्हापूर : इस्त्राईल-इराण युध्दाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. मार्च अखेर आल्याने बँकांची कर्जाच्या वसुलीची लगबग वाढली आहे. पण, युध्दामुळे सगळेच मार्केट सावध पाऊले टाकत आहे, त्यात साखर कारखान्यांकडे ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये अडकल्याने सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांची यंदा वसुली करताना पुरती दमछाक उडत आहे.
दरवर्षी वित्तीय संस्थांना जानेवारीपासूनच वसुलीच्या मागे लागावे लागते. मार्च संपण्यासाठी दहा दिवस राहिल्याने वसुली पथके अधिक आक्रमक झाल्याचे दिसते. यंदा, युध्दाचा परिणाम थेट मार्केटवर दिसत आहे. संपूर्ण मार्केट सावध पाऊले टाकत असल्याने व्यवहार काहीसा विस्कळीत दिसत आहे. व्यावसायिक कर्जे काहीसी थांबली आहेत. त्याचा परिणाम बँकांच्या कर्ज वाटपासह वसुलीवरही दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणाचे प्रमुख केंद्र असलेला साखर कारखान्यांकडून शेवटच्या महिन्यात गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. मार्चअखेर संपूर्ण पीक कर्जाची परतफेड झाली नाहीतर डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहेत.
गावोगावी वसुली पथकांच्या गाड्या
सहकारी बँका, पतसंस्था, क्रेडिट सोसायटीकडून ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात कर्ज उचल असते. तारणांसह विनातारण कर्जदारांची संख्याही खूप असते. वर्षभर परतफेडीकडे दुर्लक्ष केलेल्या कर्जदारांच्या दारात जाण्याची वेळ वित्तीय संस्थांना येते. त्यामुळे सध्या गावोगावी वसुली पथकांच्या गाड्या फिरू लागल्या आहेत.
सोनेतारण कर्जाला तेजी!
सध्या सोन्याला भाव चांगला असल्याने सोने तारण कर्ज वाटप वाढले आहे. साधारणता गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. त्यात व्याजदर कमी आणि इतर कागदपत्रांची कटकट नसल्याने सध्या सोनेतारण एकदम जाेरात सुरू आहे.
युध्दामुळे व्यावसायिक कर्ज वितरणावर थोडासा परिणाम दिसत आहे. एकूणच मार्च अखेर आली की वसुलीसाठी सगळ्यांचीच तारांबळ उडते. पण, यंदा अद्याप साखर कारखान्यांकडून शेवटच्या महिना-दीड महिन्यांची ऊस बिले यायची आहेत, त्याचाही परिणाम वसुली दिसत आहे. - मंगेश पाटील (शाखा व्यवस्थापक, यशवंत सहकारी बँक, रंकाळावेश)