Kolhapur- गर्भलिंग निदान प्रकरण: मडिलगेच्या विजय कोळसकरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:53 IST2025-03-05T11:53:04+5:302025-03-05T11:53:56+5:30
सोनोग्राफी मशिनचा पुरवठादार, चौथ्या गुन्ह्यात सहभाग

Kolhapur- गर्भलिंग निदान प्रकरण: मडिलगेच्या विजय कोळसकरला अटक
कोल्हापूर : कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्यासाठी येणारा विजय लक्ष्मण कोळसकर (वय ४०, रा. मडिलगे, ता. भुदरगड) याला करवीर पोलिसांनी सोमवारी (दि. ३) रात्री अटक केली. त्याच्याकडील सोनोग्राफी मशिनचा शोध सुरू आहे. मे २०२४ मध्ये करवीर पोलिसांनी त्याच्या घरातून एक सोनोग्राफी मशिन जप्त केले होते. त्यानंतर पुन्हा याच गुन्ह्यात त्याला अटक झाली. त्याच्यावर हा चौथा गुन्हा आहे.
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या संशयावरून आरोग्य विभागाने १२ फेब्रुवारीला कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा टाकून कारवाई केली होती. त्यावेळी कारवाईची चाहूल लागताच गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशिन घेऊन येणारा संशयित गायब झाला होता. मडिलगे येथील विजय कोळसकर हाच सोनोग्राफी मशिन घेऊन येणार होता, असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
गेल्या १५ दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी रात्री पोलिसांनी मडिलगे येथून त्याला अटक केली. त्याच्याकडील सोनोग्राफी मशिन अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्याने मशिन कोणाकडे दिले, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. गर्भपात करणाऱ्या टोळ्यांना सोनोग्राफी मशिन पुरवण्याचे काम तो करतो. यापूर्वी त्याच्यावर करवीर, भुदरगड आणि राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कोळसकर सराईत आरोपी
विजय कोळसकर हा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमधील सराईत आरोपी आहे. यापूर्वी मे २०२४ मध्ये झालेल्या कारवाईत करवीर पोलिसांनी त्याच्या घरातून मोबाइल सोनोग्राफी मशीन जप्त केले होते. त्याच्यावर वर्षभरात चौथा गुन्हा दाखल झाला.
मशिन कुठून आणले?
यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेले मशिन कर्नाटकातून आणल्याचे कोळसकरने सांगितले होते. त्यानुसार पोलिस कर्नाटकातील मशिन विक्रेत्यापर्यंत पोहोचले होते. आता पुन्हा त्याने मशिन कोठून आणले, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या इतर सहकाऱ्यांचाही शोध सुरू आहे.