पीडित महिलांचे राजकारणासाठी भांडवल, रूपाली चाकणकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:58 IST2025-07-29T12:56:16+5:302025-07-29T12:58:11+5:30
हनी ट्रॅपबद्दल कोणत्याही तक्रारी नाहीत

पीडित महिलांचे राजकारणासाठी भांडवल, रूपाली चाकणकर यांची टीका
कोल्हापूर : ज्या बाबी न्यायप्रविष्ट आहेत. अशा प्रकरणातही ज्यांनी पीडितांना घेऊन जाहीर पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्यावर स्वत:वर वेळ आल्यानंतर मात्र त्यांना राजकारण दिसायला लागले आहे. परंतु त्यांनी पीडित महिलांचेराजकारणासाठी भांडवल केले, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर सोमवारी केली.
येथील पोलिस मुख्यालयातील बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, महाराष्ट्र पाहतोय, कुठल्या गोष्टीची त्या पाठराखण करत आहेत ते. न्यायप्रविष्ट असलेल्या फुके प्रकरणातसुद्धा पीडितांना घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन संबंधित पीडितांनाच त्रास दिला. आमचा कायद्यावर विश्वास आहेच, तो त्यांनी देखील ठेवला असता तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले नसते. अशा घटना ज्या पद्धतीने राजकीय घरातून घडत आहे ते चुकीचे आहे. अशा लोकांवर लगाम बसला पाहिजे.
चाकणकर म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात मी स्वतः बीट मार्शल आणि दामिनी पथकासोबत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधते. मला शक्य नाही तेथे प्रतिनिधी जातात. महाराष्ट्रात ही यंत्रणा फार सक्रिय करण्यात आली आहे. हनी ट्रॅपबद्दल आमच्याकडे कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत.
कोल्हापुरात चांगले काम
चाकणकर म्हणाल्या, आयोगाकडे ज्या तक्रारी येतात त्या आम्ही प्रत्येक जिल्ह्याला पाठवतो. कोल्हापूरला माझ्या सर्वाधिक भेटी झाल्या असून यासंदर्भात कोल्हापूरच्या पोलिस, कामगार आणि जिल्हाधिकारी विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवले आहे. कोल्हापुरात दोन वर्षांत तीन जनसुनावण्या झाल्या. त्यानंतर यंत्रणेमध्ये चांगला बदल झाला आहे.