अफवांमुळे निष्पाप फिरस्त्याचा बळी

By Admin | Updated: August 25, 2015 00:06 IST2015-08-25T00:00:22+5:302015-08-25T00:06:55+5:30

सहा दिवस मृत्यूशी झुंज : ४५० ग्रामस्थांवर खुनाचा गुन्हा

Victim of innocent torture due to rumors | अफवांमुळे निष्पाप फिरस्त्याचा बळी

अफवांमुळे निष्पाप फिरस्त्याचा बळी

कोल्हापूर : फुलेवाडी-शिंगणापूर रस्त्यावर चोर समजून मारहाण केलेल्या फिरस्त्याचा सोमवारी सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले सहा दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. चोरांच्या अफवेने निष्पाप फिरस्त्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी करवीर पोलिसांनी ४५० हून अधिक ग्रामस्थांवर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
फुलेवाडी-शिंगणापूर रस्त्यावर दि. १९ आॅगस्टला दुपारी चारच्या सुमारास ३५ वर्षांच्या फिरस्त्याला चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत हा फिरस्ता गंभीर जखमी झाला होता. करवीर पोलिसांनी ग्रामस्थांच्या तावडीतून त्याची सुटका करून सीपीआरमध्ये दाखल केले होते. परंतु, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता. त्याला वाचविण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. गेले सहा दिवस त्याच्या देखभालीसाठी एक कॉन्स्टेबल ठेवण्यात आला होता. परंतु, सोमवारी सकाळी त्याचा श्वास बंद पडला. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच नागरिकांसह पोलिसांनी हळहळ व्यक्त केली, तर मारहाण करणाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. फिरस्त्याचा मृतदेह तीन दिवस ओळख पटविण्यासाठी ससून रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिकडेच त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सांगितले.
मस्ती भोवली
फुलेवाडी-शिंगणापूर परिसरात हा फिरस्ता गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फिरत होता. परिसरातील लोकांकडे जेवण मागून उदरनिर्वाह करीत होता. ही बाब अनेक नागरिकांना माहीत होती. तरीही त्यास काही हुल्लडबाज तरुणांनी अगदी ‘फिल्मी स्टाईल’ने मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शंभर जणांची नावे निष्पन्न झाली असली तरी मारहाण करणाऱ्या सुमारे २० ते २५ जणांची नावे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार अटकेनंतर या संशयिताना पोलीस कोठडीसह कारावासात किमान तीन महिने मुक्काम करावा लागणार आहे.

Web Title: Victim of innocent torture due to rumors