बॅडमिंटन खेळून घराजवळ आला, पण 'वरुण'वर काळाने घातला घाला; मद्यपी चालकाच्या बेदरकारीने हाकनाक बळी गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:52 IST2023-10-20T15:51:30+5:302023-10-20T15:52:00+5:30
अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले

बॅडमिंटन खेळून घराजवळ आला, पण 'वरुण'वर काळाने घातला घाला; मद्यपी चालकाच्या बेदरकारीने हाकनाक बळी गेला
कोल्हापूर : इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारा वरुण रवी कोरडे (वय २२, रा. उदयसिंहनगरी, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) हा वर्गात हुशार. शिक्षकांचा आवडता आणि मित्रांचा जीवलग दोस्त. बॅडमिंटनचा खेळाडू असलेला वरुण त्याच्या उदयसिंहनगरीत प्रेमळ स्वभावाने सर्वांचा लाडका होता. बुधवारी रात्री बॅडमिंटनचा सराव करून घराकडे परतताना महावीर कॉलेजसमोर भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली आणि अवघ्या १०० मीटरवर असलेल्या त्याच्या घरी तो पोहोचू शकला नाही. या अपघाताने उदयसिंहनगरी गहिवरली.
नावीन्याचा ध्यास, सळसळता उत्साह, खेळाची आवड आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला वरुण त्याच्या आई-वडिलांसाठी श्रावणबाळासारखा होता. आई शिक्षिका, वडील नोकरदार, तर मोठी बहीणही उच्चशिक्षित. घरातील उच्चशिक्षणाची परंपरा वरुण पुढे चालवत होता. शिक्षणातील हुशारीसोबतच खेळाची आवड असल्याने तो नियमित बॅडमिंटन खेळत होता. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे तो रॅकेट घेऊन मोपेडवरून घरातून बाहेर पडला. ताराबाई पार्कात बॅडमिंटनचा सराव संपवून तो घराकडे निघाला.
सारे काही नेहमीप्रमाणे होते. रस्त्यात मध्येच अपघाताच्या रूपाने काळ आडवा येणार असल्याची कल्पनाही त्याला नसावी. तो काळ आला आणि वेळही आली. बावड्याकडून शहरात निघालेल्या भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली. त्याला फरफटत नेले आणि अवघ्या काही सेकंदांत तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. दुर्दैव म्हणजे अपघाताच्या ठिकाणापासून त्याचे घर अवघे १०० मीटरवर आहे.
नेहमीच्या वेळेत मुलगा घरी परतला नसल्याने त्याची आई अस्वस्थ होती. तेवढ्यात शेजारचे काही तरुण घरात पोहोचले. वरुणचा अपघात झाल्याचे ऐकताच कोरडे दाम्पत्याचे हातपाय गळाले. घाबरलेल्या नजरेने दोघे सीपीआरमध्ये पोहोचले. मुलगा जखमी असेल तर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती; पण तो कुठेच दिसत नाही..पोलिस काही सांगत नाहीत..त्याच्या मित्रांना शब्द फुटत नाहीत. तुमचा मुलगा आता या जगात राहिला नाही, असे सांगण्याचे धाडस कोणातच नव्हते. अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले.
तरुणांचा पुढाकार
अपघात घडल्यानंतर वरुणची ओळख पटवण्यापासून ते त्याच्या आई-वडिलांना धीर देण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी महावीर कॉलेज परिसरातील तरुणांनी पार पाडली. मित्र गेल्याचे दु:ख लपवून वरुणच्या आई-वडिलांना सावरणाऱ्या तरुणांनी त्यांच्या परिपक्वतेचा परिचय दिला.