केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप व्यर्थ; बारा सोनाग्राफी मशिन्स बंदच, कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:16 PM2023-06-24T18:16:31+5:302023-06-24T18:16:53+5:30

सात महिने होऊन गेले तरी परिस्थिती तिच

Union Minister of State for Health rages in vain; Status of rural hospitals in Kolhapur, twelve sonography machines closed | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप व्यर्थ; बारा सोनाग्राफी मशिन्स बंदच, कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांची स्थिती

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप व्यर्थ; बारा सोनाग्राफी मशिन्स बंदच, कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांची स्थिती

googlenewsNext

दीपक जाधव

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांतील बारा सोनोग्राफी मशिन्स डाॅक्टरांअभावी बंद आहेत. ती सुरू करण्याचे आदेश सात महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी सीपीआरमधील बैठकीत दिले होते. आता त्या पुन्हा कोल्हापूरला येत आहेत. परंतु, तेव्हा बंद असलेली मशिन्स त्याच कारणासाठी अजूनही बंद असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये मंत्री डॉ. पवार यांनी अचानक सीपीआर रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी जिल्ह्यातील सोनोग्राफी मशिन्स डाॅक्टर जायला तयार नसल्याने बंद असल्याचे समजताच त्या प्रचंड संतापल्या होत्या. गरिबांची सेवा करायला म्हणून डाॅक्टर होता आणि डाॅक्टर झाला की सेवा करायचे कसे विसरता, अशी विचारणा त्यांनी केली होती. डाॅक्टर नसतील तर आहेत त्या डाॅक्टरांचे रोटेशन लावा. पण गरोदर मातांना सेवा द्या, अशा भाषेत त्यांनी उपस्थितांना सुनावले होते. याला सात महिने होऊन गेले तरी परिस्थिती तिच आहे.

जिल्ह्यात आजघडीला फक्त इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज या दोनच ठिकाणची मशिन्स वापरात आहेत. दोन नादुरूस्त आहेत. हातकणंगले, दत्तवाड, नेसरी, सेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वसाहत रुग्णालय गांधीनगर ,कोडोली, गारगोटी येथील मशिन्स डाॅक्टर जायला तयार नसल्याने बंद आहेत.

खासगी केंद्रांचा आधार...

गरोदर महिलांची तिसऱ्या, सहाव्या व नवव्या महिन्यात सोनोग्राफी करावी लागते. ही मशिन्स बंद असल्याने दुर्गम, ग्रामीण भागातील या महिलांना खासगी केंद्राचा आधार घ्यावा लागतो. तिथे एका वेळेसाठी १००० ते १२०० रुपये खर्च येतो. शासनाने ७० ते ८० लाख रुपये खर्चून मशिन खरेदी केली, पण तंत्रज्ञाअभावी ती बंद आहेत.

जाहिरातीला प्रतिसाद शून्य

राष्ट्रीय आरोग्य योजनेतून रेडिओलॉजिस्ट हे पद कंत्राटी पद्धतीवर भरण्यासाठी जाहिराती दिल्या जातात. तिथे मासिक वेतन ७५ हजार रुपये असते. म्हणजे दिवसाला २,५०० रूपये मिळतात. मात्र, बाहेर स्वतःचे सोनोग्राफी केंद्र सुरू केले तर दिवसाला १५ ते २० हजार रुपये मिळतात. यामुळे शासनाने हे पद कंत्राटी पद्धतीवर न भरता कायमस्वरूपी भरावे, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील १४ मशिनपैकी दोन मशिन चालू असून, दोन मशिन नादुरूस्त तर उर्वरित १२ मशिन रेडिओलॉजिस्टअभावी बंद आहेत. यासाठी जाहिरात दिली आहे. - डाॅ. सुनील देशमुख, प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर

Web Title: Union Minister of State for Health rages in vain; Status of rural hospitals in Kolhapur, twelve sonography machines closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.