कोल्हापुरात टेंबलाईवाडीत आयआरबीच्या इमारतीत अनोळखी मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:48 IST2024-06-21T15:47:45+5:302024-06-21T15:48:11+5:30
कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील आयआरबी कंपनीच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरील पाण्यात सडलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळला. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) ...

कोल्हापुरात टेंबलाईवाडीत आयआरबीच्या इमारतीत अनोळखी मृतदेह
कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील आयआरबी कंपनीच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरील पाण्यात सडलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळला. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) सायंकाळी निदर्शनास आला. परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे आणि शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीची हॉटेलची अर्धवट स्थितीतील इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यात पावसाचे पाणी साचले आहे. गुरुवारी सायंकाळी इमारतीजवळ खेळणाऱ्या काही तरुणांना दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी पाहणी केली असता, पाण्यात पडून सडलेल्या स्थितीतील पुरुषाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
सडलेल्या स्थितीतील मृतदेह असल्याने त्याची ओळख पटवता आली नाही. संबंधित व्यक्तीचा आठ ते दहा दिवसांपूर्वी पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. गेल्या आठ-दहा दिवसांत बेपत्ता फिर्यादही दाखल झालेली नाही, त्यामुळे फिरस्ता व्यक्ती अमली पदार्थाच्या नशेत पाण्यात पडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.