अंतर्गत लाथाळ्याने मंत्रिपद हुकल
By Admin | Updated: December 5, 2014 23:31 IST2014-12-05T23:06:35+5:302014-12-05T23:31:26+5:30
कोल्हापूरला ठेंगाच : सेनेतील ‘राजकारणा’नेच क्षीरसागर यांचा पत्ता कटे

अंतर्गत लाथाळ्याने मंत्रिपद हुकल
राजाराम लोंढे -कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेनेला सर्वांत चांगले यश हे कोल्हापूर जिल्ह्यात मिळाल्याने मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळेल, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना पक्षप्रमुखांनी ठेंगा दाखविला असला तरी त्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राजेश क्षीरसागर यांचे मंत्रिपद निश्चितच होते. परंतु, शिवसेनेंतर्गत राजकारणाचा फटका व ऐनवेळी कोकणातून दीपक केसरकर यांचे नाव निश्चित झाल्याने क्षीरसागर यांचे राज्यमंत्रिपद निसटले.
शिवसेनेला भरघोस यश दिले म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला येऊन महालक्ष्मीचा नवस फेडला. परंतु, सत्तेची संधी देताना मात्र त्यांनी हात आखडता घेतल्याची भावना त्यामुळे व्यक्त झाली. क्षीरसागर यांना राज्यमंत्रिपद दिल्यास ते डोईजड होतील, अशी भीती ज्यांना वाटली, त्यांच्याकडून मंत्रिपद मिळू नये, यासाठी सर्व पातळ्यांवर ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६० टक्के यश देणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश मिळाल्याने मंत्रिमंडळात कोल्हापूरला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळणार, अशी अटकळ होती. मंत्रिपदासाठी राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व सुजित मिणचेकर हे स्पर्धेत होते.
‘शिवसेनेचा कडवा संघटक’ म्हणून क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांचे नाव निश्चित झाले होते. चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. ‘मागासवर्गीय चेहरा’ म्हणून संधी मिळेल, असे डॉ. सुजित मिणचेकर यांना वाटत होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी होणार, हे निश्चित झाल्यापासून क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. क्षीरसागर यांना लॉटरी लागणार म्हटल्यावर शिवसेनेंतर्गत राजकारणाने उसळी घेतली. त्यातूनच त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत तक्रार केल्याची चर्चा आज, शुक्रवारी जिल्ह्यात सुरू होती.
पुन्हा वेटिंग...
भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले, त्याचदिवशी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन झाले. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला. त्याचाही फटका क्षीरसागर यांना बसला. शिवसेनेला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यातील दहाजणांचा आज शपथविधी झाला. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा रिक्तआहेत. त्यामध्ये सहभागाच्या कोल्हापूरकरांना
आशा आहेत; पण आता मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार, हेही महत्त्वाचे आहे. हा
विस्तार होण्यास काही महिने जातील. शिवसेनेने सध्या ज्यांना संधी दिली आहे, त्यात मागासवर्गीय नेतृत्व फारसे कुणी नाही. त्यामुळे तो निकष लागला तर आमदार मिणचेकर यांचे नाव पुढे सरकते. तोच क्षीरसागर यांना जास्त धोका आहे.
फटाके, डिजिटलची तयारी
गेले आठ दिवस प्रसारमाध्यमांमधून क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सवही साजरा केला होता. उत्साही कार्यकर्त्यांनी स्वत:च खातेवाटप करून नगरविकास राज्यमंत्री म्हणून व्हॉट्स अॅपवरून मेसेज फिरविले; त्यांच्या विरोधकांनी त्याची माहिती ‘मातोश्री’वर पोहोच केल्याचे समजते.