Kolhapur: उद्धवसेनेच्या गडहिंग्लज शहरप्रमुखाला ठार मारण्याची धमकी, मध्यस्थाला कार्यकर्त्यांचा चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:05 IST2024-10-15T14:05:05+5:302024-10-15T14:05:38+5:30
खंडणीची तक्रार : ‘पोलिसाचा’ही सहभाग?

Kolhapur: उद्धवसेनेच्या गडहिंग्लज शहरप्रमुखाला ठार मारण्याची धमकी, मध्यस्थाला कार्यकर्त्यांचा चोप
गडहिंग्लज : खंडणी उकळण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उद्धवसेनेचे गडहिंग्लज शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. या प्रकरणातील मध्यस्ताला संतप्त कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याही सहभाग असल्याची माहिती चिकोडे यांनी पत्रकारांना दिली. या प्रकारामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, पंधरा दिवसांपूर्वी पुणे, आकुर्डी आणि पन्हाळा तालुक्यातील उंडरी येथील रहिवासी असलेल्या महिलेसह चौघांनी चार चाकी वाहनातून (एमएच १२ - व्हीव्ही ३८१६) सुमारे ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गडहिंग्लजला रोखीने आणले होते. रात्री गुंतवणूकदारांची वाट पाहत ते आजरा रोडवरील एका वसाहतीमध्ये थांबले होते.
पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून संबंधित वाहनासह ही रोकड ताब्यात घेतली. तत्कालीन पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी यासंदर्भातील अहवाल आयकर विभागाला पाठविला आहे. रोकड जप्तीची कारवाई करताना साक्षीदार म्हणून शहरप्रमुख चिकोडे हे उपस्थित होते.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी ‘त्या’ स्थानिक मध्यस्थाने उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप कुराडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ‘५० लाखांच्या प्रकरणात चिकोडे यांच्या खुनाची सुपारी कर्नाटकातील गुंडांना देण्यात आली आहे. त्यांचे काय असेल ते पैसे देऊन मिटवा,’ असे त्याने कुराडेंना सांगितले. त्यानुसार चिकोडे यांनी प्रकाराची माहिती घेतली.
सोमवारी (१४) ‘त्या’ मध्यस्ताला चिकोडे यांनी बोलावून घेतले होते. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. दरम्यान, त्याने एका पोलिसाच्या सांगण्यावरून आपण हे केल्याचे सांगितले. त्यानंतर ‘त्या’ मध्यस्थाला पोलिसांच्या हवाली करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.
जिल्हा पोलिस प्रमुखांकडे दाद जाणार
‘त्या’ मध्यस्थाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्यासह दोघांविरुद्ध आपण गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दिली आहे. दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण जिल्हा पोलिसप्रमुखांकडे दाद मागणार आहोत, असेही चिकोडे यांनी यावेळी सांगितले.
५० लाखांचे प्रकरण साक्षीदाराच्या जिवावर
पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी ५० लाखांची रोकड जप्त केली. त्यावेळी चिकोडे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. सरकारी कामात मदतीला गेल्यामुळेच त्यांच्या जिवावर हे प्रकरण बेतल्याची चर्चा आहे.