Kolhapur Municipal Election 2026: आघाडीसाठी उद्धवसेना, राष्ट्रवादीचे प्रस्ताव - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:54 IST2025-12-17T15:53:16+5:302025-12-17T15:54:14+5:30
आज सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेणार

Kolhapur Municipal Election 2026: आघाडीसाठी उद्धवसेना, राष्ट्रवादीचे प्रस्ताव - सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसच्या समितीने उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व इतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली असून त्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. या प्रस्तावावर आज बुधवारी सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसेनेबरोबर चर्चा झाली असून त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. कोणत्या प्रभागात उमेदवारी ॲडजेस्ट करता येईल यावर सगळे मिळून चर्चा करू आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
महायुतीने केवळ घोषणा केल्या
महायुतीने साडेतीन वर्षांत नुसत्या घोषणा केल्या, कोणताही निधी आणला नाही. अंबाबाईच्या आराखड्यासाठी आमच्या काळात पैसे आले, पण नंतर निधी आला नसल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
किरकोळ तक्रारी नाहीत
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर बऱ्याच जणांनी कार्यक्रम घेतले. आम्ही घेतले नाहीत. कारण आचारसंहिता बंधन सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना जास्त आहे. प्रशासनाने विरोधकांचे फलक हटवले, सत्ताधाऱ्यांचे मात्र तसेच आहेत, असे सांगत आम्ही किरकोळ तक्रारी करत नसल्याचा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
कचऱ्याचा ढीग आकाशाला टेकला
आमच्या काळात झूम प्रकल्पातील कचऱ्याचा ढीग जमिनीबरोबर आला होता, तो आता आकाशाला टेकला आहे, असा आरोप करत आमदार पाटील यांनी कोल्हापूर शहराची धुरा आम्ही सक्षमपणे सांभाळल्याचा दावा केला. साडेतीन वर्षांत सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात काम कुठे केले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.