Kolhapur News: 'त्या' दोन पोलिसांचे अखेर निलंबन; गुन्हा दाखल न करण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:39 IST2026-03-11T11:39:29+5:302026-03-11T11:39:50+5:30
फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून सात लाख रुपयांची मागणी केली होती.

Kolhapur News: 'त्या' दोन पोलिसांचे अखेर निलंबन; गुन्हा दाखल न करण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी
गोकुळ शिरगाव : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागून चार लाखांवर तडजोड करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कडक प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
यामध्ये इजाज महंमद शेख (पोलिस शिपाई, गोपनीय विभाग – रा. करनूर, ता. कागल), तर दुसरा नितेश मारुती कांबळे (पोलिस हेड कॉन्स्टेबल – रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) मूळ तक्रारदाराविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एक लेखी तक्रार आली होती. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी इजाज शेख आणि नितेश कांबळे यांनी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून सात लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीत चार लाख रुपये देण्याचे ठरले आणि ही रक्कम दोन दिवसांत देण्यास सांगण्यात आले होते.
तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. एसीबीने केलेल्या पडताळणीत इजाज शेख याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, तसेच या कटात हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले. प्रत्येक महिन्याला कारखाने, हॉटेल्स, पान टपऱ्यावर जाऊन हप्ते वसुली करण्याचे काम करीत असल्याचे आता समोर आले आहे.
स्वतःच्याच ठाण्यात गुन्हा: विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात हे दोघे कार्यरत आहेत, त्याच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, कर्तव्यात कसूर आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत आज दुपारी त्यांचे निलंबन करण्यात आले. लाचेची मागणी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केल्याने या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.