Kolhapur News: मॉर्निंग वॉक जीवावर बेतले, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:25 IST2023-04-12T14:06:08+5:302023-04-12T14:25:22+5:30
वडगाव आष्टा रोडवर झाला अपघात

Kolhapur News: मॉर्निंग वॉक जीवावर बेतले, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
नाना जाधव
भादोले : अज्ञात वाहनाच्या धडकेत फिरायला गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शालन बाळू वडडर (वय ७० रा. कुळरप ता. वाळवा), दिलीप विठ्ठल पाटील (५८ रा. भादोले) अशी मृतांची नावे आहेत. भादोले नजीक मसोबा फाटा जवळ आज, बुधवारी (दि.१२) पहाटे पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, वडगाव-भादोले रस्त्यावर मसोबावाडी फाट्या नजिक अज्ञात चार चाकी वाहन चालक आष्टाकडे निघाला होता. तर वडगाव कडून फिरून परत भादोले गावाकडे दोघेजण स्वतंत्रपणे जात होते. यावेळी कार चालकाने प्रथम वड्डर यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. तर काही अंतरावरच पुढे दिलीप पाटील यांना याच कारने धडक दिली. यावेळी पाटील यांच्या छातीवरून कारचे चाक गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला.
शालन वड्डर या माहेरी यात्रेसाठी आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. तर दिलीप हे साखर कारखान्यात नोकरीस होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी भादोले येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या दुर्दैवी अपघातानंतर भादोले गावावर शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत गणपती मोतीराम पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.