कोल्हापुरातील जवाहरनगरात भररस्त्यात दोन गट भिडले, सराईत गुंड अमोल भास्करसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:45 IST2025-07-17T15:45:17+5:302025-07-17T15:45:41+5:30
तलवार, चाकू, हॉकी स्टीकचा वापर

कोल्हापुरातील जवाहरनगरात भररस्त्यात दोन गट भिडले, सराईत गुंड अमोल भास्करसह चौघांना अटक
कोल्हापूर : त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी गुलाल उडविण्याचे मशीन (पेपर ब्लस्टर) दिले नसल्याच्या कारणातून जवाहरनगरातील बिजली चौकात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. काही जणांनी विरोधी गटातील तरुणांच्या घरात जाऊन तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली. हा प्रकार मंगळवारी (दि. १५) दुपारी घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, सराईत गुंड अमोल महादेव भास्करसह दोन्ही गटांतील १० जणांवर गुन्हा दाखल झाला. भास्कर याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली.
यात्रेसाठी गुलाल उडविण्याचे मशीन दिले नसल्याच्या रागातून प्रथमेश हरी सोनवणे (वय २५) याला चौघांनी काठी, हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमरास बिजली चौकात घडला. त्याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विजय सुरेश कदम (२५), सागर दिनकर सोनवणे (३४), अजय सुरेश कदम (२३) आणि सुरेश शंकर कदम (४६, सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीनंतर सुरेश कदम याने फिर्यादी प्रथमेश याच्या घरी जाऊन त्याच्या आईला तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली.
यानंतर काही वेळातच श्री लॉनसमोर अंगावर पाणी टाकल्याचे निमित्त करून सागर दिनकर सोनवणे (३४) आणि त्यांचा भाचा विजय कदम यांना अमोल भास्कर याच्यासह सहा जणांनी हॉकी स्टीकने मारहाण केली. सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अमोल भास्कर, पिंटू भास्कर, ओम भास्कर, प्रथमेश सोनवणे, रोहित चव्हाण आणि प्रतीक थोरात (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. भरदिवसा दोन गटांत झालेल्या मारामारीमुळे जवाहरनगर परिसरात दहशत निर्माण झाली होती. मारामारीचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत.
चौघांना अटक
सराईत गुंड अमोल भास्कर याच्यासह पिंटू भास्कर आणि प्रथमेश सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या गटातील विजय कदम याला अटक झाली. न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. जवाहरनगर परिसरात अजूनही टोळीयुद्ध सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.