Kolhapur: पन्हाळा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांची माघार, नगरसेवकपदी रामानंद गोसावींची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:05 IST2025-11-20T17:04:53+5:302025-11-20T17:05:31+5:30
Local Body Election: जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांचे नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

Kolhapur: पन्हाळा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांची माघार, नगरसेवकपदी रामानंद गोसावींची बिनविरोध निवड
पन्हाळा: पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत शिवशाहु आघाडीचे सर्वेसर्वा सतीश कमलाकर भोसले यांच्यानंतर जनसुराज्य पक्षाचे रामानंद गोसावी यांचीही बिनविरोध निवड झाली. गोसावी यांच्या विरोधातील जनसुराज्य पक्षाच्या दोघा कार्यकर्त्यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, जनसुराज्य पक्षाच्या माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल व ऐश्वर्या तोरसे यांनी नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता तीन अर्ज राहीले आहेत.
प्रभाग क्रमांक ३/अ मध्ये नागरीकांचा मागासवर्ग गटातुन रामानंद गोसावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात नुरमहंम्मद नगारजी व जमीर गारदी हे जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते उभे राहिले होते. त्यांनी माघार घेतल्याने गोसावी यांची बिनविरोध निवड झाली. गोसावी हे यापुर्वीही नगरसेवक व त्यांच्या पत्नी सुरेखा गोसावी जनसुराज्य पक्षाकडून उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे.
आज, गुरुवारी दुपारनंतर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून आढावा घेत होते. शुक्रवार माघार घेण्याचा शेवट दिवस असल्याने आमदार डॉ. विनय कोरे पन्हाळगडावर येऊन अपक्ष उमेदवारांची भेट घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. बहुतेक अपक्ष उमेदवार गेले दोन दिवस फोन बंद करून गायब झाले आहेत.