Twelfth paper given by the mother's fire | आईच्या चितेला अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर

आईच्या चितेला अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर

ठळक मुद्देआईच्या चितेला अग्नी देऊन दिला बारावीचा पेपरपन्हाळा तालुक्यातील देवाळे गावातील घटना

कोल्हापूर : दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा पेपर देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावी ही घटना घडली.

रंजना तानाजी पाटील (वय ४८) या काही वर्षांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांनी अन्नपाणी सोडले होते. त्यांचा मुलगा श्रीनाथ हा देवाळे महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकतो. सध्या त्याची परीक्षा सुरू आहे.

अभ्यास करून तो आईची सेवा करीत असे. सोमवारी (दि. १७) रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करीत बसला होता. मंगळवारी सकाळी आईला उठविण्यासाठी गेला असता ती निपचित पडली होती. तिचा श्वास बंद होता. ती देवाघरी गेल्याचे समजताच नातेवाइकांनी टाहो फोडला.

आईच्या चितेला अग्नी देऊन तो पुन्हा जड अंत:करणाने परीक्षेला गेला. आईच्या विरहाचे अश्रू टिपत त्याने जड मनाने इंग्रजीचा पेपर दिला. श्रीनाथवर कोसळलेले दु:ख पाहून परिसरातील लोकांना गहिवरून आले. रंजना पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.
 

 

Web Title: Twelfth paper given by the mother's fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.