गोकुळ शिरगांव: येथील पुणे-बेंगळुरु महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे जैन मंदिरासमोर आज, शनिवारी दुपारच्या सुमारास कच्च्या आल्याची पोती घेऊन जाणारा ट्रक (क्र. के. ए. १८ सी. ७२८८) उलटला. कर्नाटकहून अहमदाबादकडे दोन आयशर ट्रक आल्याची पोती घेऊन जात असताना, समोरून जाणाऱ्या एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला.ट्रक चालकाने डाव्या बाजूला ट्रकची चाके वळवण्याचा प्रयत्न केला असता, चाके घसरून ट्रक बाजूच्या सर्व्हिस रोडवर पलटी झाला. हा अपघातमहामार्गावरून थेट सर्व्हिस रोडवर झाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सुमारे एक तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.उजळाईवाडीच्या हायवे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचालकांपैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात ट्रकचे लाखोंचे नुकसान झाले असून, ट्रकच्या पुढील भागाला मोठे नुकसान पोहोचले आहे.
पुणे-बेंगळुरु महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ ट्रक पलटी, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:42 IST