Kolhapur: अंबाबाईच्या दारी.. पारंपरिक पोषाखच भारी..!, भाविकांनी व्यक्त केल्या भावना
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 15, 2025 16:03 IST2025-05-15T16:02:53+5:302025-05-15T16:03:23+5:30
सामाजिक भान राखण्याची गरज

Kolhapur: अंबाबाईच्या दारी.. पारंपरिक पोषाखच भारी..!, भाविकांनी व्यक्त केल्या भावना
इंदुमती गणेश
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे मांगल्य, पावित्र्य असणारे धार्मिक स्थळ आहे. देवीच्या दर्शनासाठी येताना तो भाव जपला पाहिजे. छोटे कपडे घालून फिरायला अनेक ठिकाणे आहेत, तिथे मनसोक्त पर्यटन करावे पण देवाच्या दारात पारंपरिक भारतीय, महाराष्ट्रीयन पोषाखातच आले पाहिजे, अशा भावना परस्थ महिला भाविकांनी बुधवारी व्यक्त केल्या.
अंबाबाईसह जोतिबा मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येताना परस्थ: भाविक विशेषत: मुली, महिला तोकडे व अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून येतात. पुरुषदेखील बर्म्युडा, र्थीफोर्थ घालून येतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केली असून भाविकांनी पारंपरिक साडी, चुडिदारसारख्या व अंगभर कपडे घालून मंदिरात यावे, असे आवाहन केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर लोकमतने बुधवारी थेट भाविकांच्या भावना जाणून घेतल्या. सर्व मुली व महिला तसेच अगदी पुरुष भाविकांनीदेखील मंदिरात येताना पारंपरिक कपडे घालूनच आले पाहिजे, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, मंदिराचे पावित्र्य व सामाजिक भान राखले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.
या देवस्थानांना आहे ड्रेसकोड
दक्षिणेतील (आंध्र)मधील सर्व देवस्थानांमध्ये पारंपरिक वेशभूषेशिवाय प्रवेश नाही. गोव्यातील मंगेशी, शांतादुर्गा मंदिर, जेजुरी, सिद्धीविनायक, त्र्यंबकेश्वर यासह आणखी काही मंदिरांमध्ये ड्रेसकोडचा नियम आहे.
अंबाबाई मंदिर हे आईचे पवित्र स्थान आहे. तिला भेटायला येताना पारंपरिक वेषभूषेतच आले पाहीजे. आपण वडिलधाऱ्या माणसांसमोर आदर बाळगून शिस्तीत राहतो त्याप्रमाणे देवस्थानांमध्येही हा आदरभाव जपला गेला पाहिजे. - रेखा साळवे (छत्रपती संभाजीनगर)
मी आतापर्यंत चारवेळा कोल्हापूरला आले आहे. आपण देवाला भेटायला येताना प्रत्येक भाविकाच्या मनात चांगले भाव आले पाहिजे. परिसरातील वातावरण पावित्र्य राखणारे राहिले पाहीजे. - अश्विनी बेद्रे (बेळगाव)
अंबाबाई, जोतिबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. बाहेर कुठेही आपण पाश्चिमात्य कपड्यात फिरू शकतो पण मंदिरासारख्या ठिकाणी तरी संस्कृती जपली पाहीजे. - प्रज्ञा गंगधर (विद्यार्थिनी, जयसिंगपूर)
महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे, ती जपण्याचे काम भावी पिढीचे आहे. पण हे भाविकांना लक्षात येत नसेल तर नियम लावले पाहीजे. त्यामुळे ड्रेसकोडचा नियम योग्य आहे. - सुहास शिंदे (वाळवा)
देवाच्या दारात येताना मनात फक्त श्रद्धेचा भाव असला पाहिजे. तिथे फॅशन, स्टाईल, अंगप्रदर्शन या गोष्टींना थारा नाही. आपण मनशांती देवीशी एकरूप होण्यासाठी येतो. पण विनाकारण चुकीच्या अर्थाने आकर्षणाचे केंद्र होऊ नये. - श्रृती भुवड (मुंबई)
पर्यटनासाठी हवी तेवढी ठिकाणे आहेत, पण मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तिथे येताना त्या-त्या प्रांतांची पारंपरिकता, संस्कृती जपली पाहिजे. देवीच्या दर्शनाला देशभरातून भाविक येतात. त्यामुळे पोषाखाची काळजी घेतली जावी.- अमन मुजावर (वाळवा)
साडी, चुडीदार असा भारतीय पारंपरिक पोषाख चांगला आहे. किमान मंदिरांमध्ये जाताना हा पोषाख घालता पाहिजे. महिला, मुली किंवा पुरुष कोणीही असो, आपल्या देवस्थानांचा आदर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. - विधीता नाईक ( गोवा)
मी पहिल्यांदा अंबाबाई दर्शनासाठी आले. खूप प्रसन्न वाटले. मंदिरांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. इथे देवी-देवता हे सर्वोच्च असतात, अशा श्रद्धेय ठिकाणी फॅशन किंवा कपडे किंवा देखणेपण याचे काही मोल नाही. साधेपणा जपला पाहीजे. - अंकिता भरणे (मुंबई)
मी राजस्थानहून खास देवीच्या दर्शनासाठी आले आहे. मंदिरांसाठी ड्रेसकोडचा नियम योग्य आहे. आपली परंपरा सर्वांनी जपली पाहिजे. - पूनम जोशी (राजस्थान)