कोल्हापुरातील पर्यटनस्थळांवर नाताळच्या सुट्यांमुळे अलोट गर्दी; लॉज, हॉटेल्स हाउसफुल्ल, वाहतुकीचीही कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:06 IST2025-12-29T12:06:01+5:302025-12-29T12:06:37+5:30
अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर रविवारी नाताळनिमित्त सुटी काढलेल्या पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासोबत दीड लाखावर भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. शहरात मोठी गर्दी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती.
सुटीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविक यांच्यामुळे गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर हाउसफुल्ल आहे. राज्यासह परराज्यांतील पर्यटकही मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. या पर्यटकांनी रंकाळा चौपाटी, कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस येथील छत्रपती म्युझियमला भेट दिली. याशिवाय किल्ले पन्हाळगड, आंबा, गगनबावडा, आंबोली, राधानगरी या निसर्गरम्य ठिकाणांसह करवीर निवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, नरसोबाची वाडी, खिद्रापूर अशा धार्मिक ठिकाणीही गर्दी केली.
मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरातील खासगी यात्री निवास, महालक्ष्मी धर्मशाळा आदींसह घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल झाली आहेत. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी, रंकाळ्यावरील पदपथ परिसरात पर्यटकांची गर्दी आहे. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने शहरातील खासगी यात्री निवास, धर्मशाळा, लॉज, हॉटेल्स तसेच घरगुती राहण्याची ठिकाणे तसेच वाहनतळे हाउसफुल्ल होती.
अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी असल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसत होते. सायंकाळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. महाद्वार परिसरात अनेकांनी खरेदीचाही आनंद लुटला. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी आहे.
- १९ डिसेंबर : ७४,८३९
- २० डिसेंबर : ८५,७२९
- २१ डिसेंबर : १,१२,२१२
- २२ डिसेंबर : ८५,०२१
- २३ डिसेंबर : ७४,९८४
- २४ डिसेंबर : १,३५,६२९
- २५ डिसेंबर : १,५२,६४३
- २६ डिसेंबर : २,३७,७९८
- २७ डिसेंबर : २,१५,९३४
- २८ डिसेंबर : १,२८,०१८