उद्या शंभर एकर जागा देतो, कोल्हापुरातील आयटी पार्क प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:41 IST2025-05-20T15:36:57+5:302025-05-20T15:41:41+5:30
‘कोल्हापूर फर्स्ट’च्या कार्यालयाचे उद्घाटन

उद्या शंभर एकर जागा देतो, कोल्हापुरातील आयटी पार्क प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्किट बेंच, इंडस्ट्री, आयटी यांसह विविध प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असून मी पुण्याचा आमदार, सांगलीचा पालकमंत्री असलो तरी माझ्यासाठी कोल्हापूर फर्स्ट असल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यातील १८ विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कोल्हापूर फर्स्टच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर फर्स्ट ही चळवळ असून, या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आता प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. जिल्ह्यातील उद्योगांना लागणारी वीज सौरऊर्जेवर उपलब्ध झाली तर वीजदर मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे सौरऊर्जेवरील विजेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
मंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर फर्स्ट जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगल्या प्रकारे समन्वयाची भूमिका बजावेल. जिल्ह्यातील जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊच; पण कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून जे विषय, प्रश्न मांडले जातील त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.
कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. सर्किट बेंच, आयटी इंडस्ट्री, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, दक्षिण महाराष्ट्राचे पर्यटन हब हे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र परिषद घेण्याची मागणी जैन यांनी केली. यावेळी बाळ पाटणकर, सर्जेराव खोत, सारंग जाधव, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, स्वरूप कदम, अमोल कोडोलीकर, हरिश्चंद्र धोत्रे, विश्वजित देसाई, दिनकर पाटील, बाबासाे कोंडेकर उपस्थित होते.
सिलिंडर रिफीलिंगचा प्रकल्प कोल्हापुरात
ज्याद्वारे रोजगार मिळेल असे प्रकल्प आणले पाहिजेत, असे सांगत मंत्री पाटील यांनी लवकरच कोल्हापुरात सिलिंडर रिफीलिंगचा प्रकल्प येत असल्याचे सांगितले. शिवाय शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉलचा प्रकल्प आणण्याचा मानस असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
उद्या आयटीसाठी शंभर एकर जागा देतो
कोल्हापूरच्या कोणत्या प्रश्नांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे हे आपणाला ठरवावे लागेल असे सांगत कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये पुण्या-मुंबईच्या किती कंपन्या येणार आहेत याची यादी द्या, उद्या आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा देतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावर आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे यांनी जिल्ह्यात ३५० आयटी कंपन्या कार्यरत असल्याचा मुद्दा मांडला.