किणी टोलनाक्याची तोडफोड

By Admin | Updated: August 27, 2015 01:18 IST2015-08-27T01:18:14+5:302015-08-27T01:18:14+5:30

पैलवानांचे कृत्य : मारहाणीत १५ कर्मचारी गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल

Tolaanaka breaks out of the tunnel | किणी टोलनाक्याची तोडफोड

किणी टोलनाक्याची तोडफोड

किणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावर झालेल्या किरकोळ वादावादीतून कोल्हापूर येथील चाळीस ते पन्नास पैलवानांनी टोलनाक्याची प्रचंड तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. त्यात पंधरा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडहून कोल्हापूरच्या दिशेने कारमधून जाणाऱ्या पैलवानांची किणी नाक्यावर टोल देण्यावरून वादावादी झाली होती. या वादावादीतून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे चाळीस ते पन्नास पैलवानांनी काठ्या, हॉकी स्टीक यांच्यासह टोलनाक्यावर अचानक चाल केली. काठ्या व लाथांनी टोलनाक्यावरील आठही बुथची त्यांनी तोडफोड सुरु केली. केबीनच्या काचा व जाळ्यांचा त्यांनी चुराडा केला. यावेळी दिसेल त्या टोल कर्मचाऱ्याला या पैलवानांनी बदडून काढले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे टोलनाक्यावरील इतर कर्मचारी भयभीत होऊन बूथ सोडून पळू लागले. त्यांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत सुमारे पंधरा कर्मचारी जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला, हाता-पायाला गंभीर मार लागला आहे. घटनेनंतर टोलनाक्यावर काचांचा खच पडला होता. तर केबीन शेजारी अनेक कर्मचाऱ्यांचे रक्त सांडले होते. या मारहाणीत टोल कर्मचारी संदीप बाळासो उतळे (वय ३३), बाबासो सिद (३८), सुनील भोसले (३०), तुषार जाधव (२३), निवास रघुनाथ मोहिते (२३), सचिन भोसले (३६), भगवान वसंत जाधव (३८, सर्व रा. घुणकी), नीलेश घोलप (किणी), आॅपरेटर सुधीर देसाई (२४), एम. के. नायक (२४), सी. एन. बहुरा (२२), ब्रह्मा कांबळे (२६), एस. आर. दास (२५), एस. एस. थोरात (२६, सर्व रा. किणी) हे जखमी झाले. यातील तिघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांवर पेठवडगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
या घटनेने कर्मचारी भयभीत झाले होते. तर नाक्यावर तणावपूर्ण वातावरण पसरले होते. या मारहाणीनंतर हे पैलवान टाटा सुमोतून निघून गेले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. (वार्ताहर)

शेतात शोधून मारहाण
मारहाण सुरु असताना टोल नाक्याच्या बुथवरुन कर्मचारी भीतीमुळे जवळच असणाऱ्या सोयाबिनच्या शेतात पळून गेले. अंधारातच त्यांचा पाठलाग करुन त्यानां पैलवानांनी शेतातच मारहाण केली. या मारहाणीत शेतात एक कर्मचारी जखमी होऊन पडला होता. त्याला शोधून उपचारासाठी पाठविले.

Web Title: Tolaanaka breaks out of the tunnel