Kolhapur: तक्रार मागे घेण्यासाठी मागितली पाच लाखांची खंडणी, तीन महिलांसह अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:40 IST2025-10-10T13:40:09+5:302025-10-10T13:40:42+5:30
डमी नोटांचे बंडल

Kolhapur: तक्रार मागे घेण्यासाठी मागितली पाच लाखांची खंडणी, तीन महिलांसह अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात
कोल्हापूर : लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या टोळीतील एक तरुण पळून गेला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. ८) रात्री मध्यवर्ती बसस्थानकासमोर सापळा रचून कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगवे दुमाला (ता. करवीर) येथील गणेश मारुती एकशिंगे (वय ३०) याच्यावर मंगळवारी (दि. ७) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी त्याला अटक झाली आहे.
अटकेनंतर पीडित महिलेसह तिचा मित्र नेताजी शिंदे याने गणेश याचे वडील मारुती एकशिंगे यांना फोन केला. तुमच्या मुलाच्या विरोधातील तक्रार मागे घेतो. यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. चर्चेअंती तीन लाखांवर तडजोड झाली. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्याने मारुती एकशिंगे यांनी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेऊन खंडणी मागणीची तक्रार केली. याबाबत अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पडताळणी करून कारवाई करण्याचा आदेश दिला.
पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि स्वाती यादव यांच्या पथकांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोर सह्याद्री हॉटेलबाहेर सापळा रचून पीडित महिला आणि तिच्या मित्राला खंडणीचे पैसे घेण्यासाठी बोलवले. पैसे स्वीकारताना तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला रंगेहाथ पकडले. न्यायालयात हजर केले असता तीन महिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. खंडणीची मागणी करणारा नेताजी शिंदे पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.
डमी नोटांचे बंडल
मारुती एकशिंगे यांच्याकडे खंडणी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावर उपाय म्हणून सहायक पोलिस निरीक्षक वाघ यांनी डमी नोटा घेऊन बंडलच्या दोन्ही बाजूला ५०० रुपयांच्या दोन खऱ्या नोटा लावल्या. असे सहा बंडल तयार करून खंडणीची रोकड तयार केली. १२ हजार रुपयांच्या रोकडसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शिकारीच अडकले जाळ्यात
लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून खंडणी उकळण्याचा कट टोळीने रचला होता. मात्र, मारुती एकशिंगे यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला. शिकार करण्याच्या प्रयत्नातील शिकारीच जाळ्यात अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.