कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नवे तीन न्यायमूर्ती; कर्णिक, चपळगावकर, दिगे यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:03 IST2026-01-05T19:03:34+5:302026-01-05T19:03:45+5:30
लवकरच नवीन डिव्हिजन बेंचसह दोन सिंगल बेंच सुरू होणार

कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नवे तीन न्यायमूर्ती; कर्णिक, चपळगावकर, दिगे यांची बदली
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह एस. जी. चपळगावकर आणि शिवकुमार दिगे यांची बदली झाली. या ठिकाणी प्रशासकीय न्यायमूर्ती एन. व्ही. सूर्यवंशी, आर. जी. अवचट आणि वृषाली जोशी यांची नियुक्ती झाली. लवकरच सर्किट बेंचमध्ये आणखी एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल बेंच सुरू होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातील एकूण १२ न्यायमूर्तींच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. यात कोल्हापूर सर्किट बेंचमधील तीन न्यायमूर्तींचा समावेश आहे. प्रशासकीय न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती दिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती चपळगावकर यांची औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात बदली झाली.
रिक्त जागी एन. व्ही. सूर्यवंशी यांची प्रशासकीय न्यायमूर्तीपदी बदली झाली. तसेच न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बदली झाली. न्यायमूर्ती अवचट आणि जोशी यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. हेच डिव्हिजन बेंचचे काम पाहणार आहेत. नाताळच्या सुट्टीनंतर सोमवारपासून (दि. ५) सर्किट बेंचचे कामकाज सुरू होत आहे.
सर्किट बेंचचा विस्तार
सर्किट बेंचचा विस्तार होत असून, लवकरच आणखी एक डिव्हिजन आणि दोन सिंगल बेंच सुरू होणार आहेत. तिन्ही कोर्टरूमचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या डिव्हिजन बेंचच्या बाजूच्या स्वतंत्र इमारतीत डिव्हिजन बेंच सुरू होईल, तर सहा मजली इमारतीमध्ये दोन सिंगल बेंचचे कामकाज सुरू होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार लवकरच याचे उद्घाटन होईल, अशी माहिती वकिलांनी दिली.