Kolhapur: गल्ली ते दिल्ली आमचीच सत्ता; देवस्थान भ्रष्टाचाराची माहिती मागवणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:42 IST2025-03-07T11:42:33+5:302025-03-07T11:42:53+5:30
तर तुम्हा दोघांना पण देवघरी पाठवण्यात येईल

Kolhapur: गल्ली ते दिल्ली आमचीच सत्ता; देवस्थान भ्रष्टाचाराची माहिती मागवणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये २०१७ ते २०२१ या काळात झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची माहिती उघड करून त्यांच्यावर कारवाई व पुन्हा समितीवर नियुक्ती होऊ नये यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सौरभ पोवार (रा. शाहूपुरी) व प्रसाद मोहिते (रा. तेली गल्ली) या क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना बुधवारी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवण्यात आली आहेत. याबाबत त्यांनी गुरुवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देवस्थानमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तसेच शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत. याआधीही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या डिसेंबरमध्येही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बोलवून आम्हाला ही माहिती गोळा करू नका, असे दटावण्याचा प्रयत्न चक्क पोलिसांकडूनच झाला. आम्ही निर्भीडपणे पाठपुरावा सुरूच ठेवला. दोषींवर कारवाई होणे अटळ असल्याने बुधवारी सकाळी सौरभ पवार यांच्या शाहूपुरीतील घरी निनावी पत्र पाठवण्यात आले असून, यात आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली आहे.
गल्ली ते दिल्ली आमचीच सत्ता
सौरभ पवार तू आणि प्रसाद मोहिते दोघांनी जो काय देवस्थानचा २०१७ पासून भ्रष्टाचार बाहेर काढलाय तो लगेच थांबवायचा नाही तर तुम्हा दोघांना पण देवघरी पाठवण्यात येईल. साल्यांनो तुम्ही अजून अंड्यात आहात, पंख फुटले नाहीत आणि आमच्या नेत्यांवर तक्रार करत आहात काय. तुम्हाला या पत्रातून एकदाच सांगत आहे देवस्थानचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा नाही. गप्प रहायचे, नाही तर गल्ली ते दिल्ली आमची सत्ता आहे. खोट्या केसेसमध्ये अडकवून तुम्हाला बाद करायचा आणि वेळप्रसंगी ठार मारायला आम्हाला वेळ लागणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे.