‘तूही रे’ एका धाग्यात गुंफल्या दोन प्रेमकथा

By Admin | Updated: September 6, 2015 23:34 IST2015-09-06T23:34:21+5:302015-09-06T23:34:21+5:30

लोकमत सखी मंचतर्फे गप्पाटप्पा : चित्रपटाच्या टीमने साधला ‘सखीं’शी मुक्त संवाद

'Thou ray' two lovers tied in one thread | ‘तूही रे’ एका धाग्यात गुंफल्या दोन प्रेमकथा

‘तूही रे’ एका धाग्यात गुंफल्या दोन प्रेमकथा

कोल्हापूर : ‘तूही रे’ हा चित्रपट म्हणजे एकाच धाग्यात गुंफलेल्या दोन प्रेमकथा आहेत. एका तरुणाचा जबाबदार वडिलांपर्यंत झालेला प्रवास, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेली घटना मांडणारा हा चित्रपट आहे, अशा शब्दांत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांनी सखी सदस्यांशी गप्पाटप्पा केल्या. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी चित्रीकरणादरम्यानचे किस्से व चित्रपटाचा प्रवास उलगडला. यावेळी या चित्रपटाचे निर्माते आशिष वाघ उपस्थित होते. या चित्रपटाच्या प्रवासात ध्वनी व्यवस्थापक उमर फारुख, निर्मितीप्रमुख मिलिंद अष्टेकर यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. ‘सुंदरा’ गीताचे संगीतकार शशांक पोवार यांच्यावतीने त्यांचे बंधू रविराज पोवार यांनी सत्कार स्वीकारला. आपल्या भूमिकेविषयी स्वप्निल म्हणाला, सिद्धार्थ नावाच्या व्यक्तिरेखेचा महाविद्यालयीन तरुणापासून ते एक जबाबदार पिता होण्यापर्यंतचा प्रवास यात मांडला आहे. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण नाही, तर दोन वेगवेगळ्या कथा एका धाग्यात गुंफल्या आहेत. सई ताम्हणकर म्हणाली, या चित्रपटात मी प्रत्येक स्त्रीच्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करते. यातील माझी व्यक्तिरेखा ग्रामीण स्त्रीची आहे. त्यात मी सांगलीची असल्याने भूमिका करताना फार अडचण आली नाही. तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘मी ‘भैरवी’ या गर्भश्रीमंत मुलीची भूमिका या चित्रपटात केली आहे, जी कडक शिस्तीची आहे; पण अबोल आहे.’ यावेळी प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ मंदा आचार्य यांनी सखींसमोर गुजराती पदार्थांचे प्रात्यक्षिक सादर केले. (प्रतिनिधी)


कोल्हापूरशी ऋणानुबंध
या गप्पांमध्ये तीनही कलाकारांनी कोल्हापूरशी असलेला आपला ऋणानुबंध उलगडला. स्वप्निल जोशीने कोल्हापूरची माती, येथील वातावरण मला नेहमीच ऊर्जा देणारे असल्याचे सांगितले. तेजस्विनीने मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाचे येथेच चित्रीकरण केल्याचे मनोगत मांडले. सई ताम्हणकरने माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग येथील रंगमंचावर झाल्याचे सांगितले.
भाग्यवान सखी सदस्या..या कार्यक्रमाचे प्रायोजक सिल्व्हर पॅलेस यांच्यावतीने सखी सदस्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील दीप्ती सासने, सुलक्षणा सुभेदार, अनिता पाटील, मानसी कुलकर्णी, विमल चौगुले या भाग्यवान सखी सदस्यांना सिल्व्हर पॅलेसच्यावतीने चांदीची नोट भेट देण्यात आली. बाल विकास मंचच्या मानसी जरग, अथर्व पाटील, दिग्विजय शिंदे, रोहिणी वाकरेकर, सार्थक संकपाळ, साक्षी गायकवाड, रणधीर निपाणकर, सानिका साळोखे, आदिती कुलकर्णी, स्मित पार्टे या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ अंंतर्गत कलाकारांसोबत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली.

Web Title: 'Thou ray' two lovers tied in one thread