Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:41 IST2025-10-25T15:41:01+5:302025-10-25T15:41:14+5:30
तीन पोलिस पथके तपासात सक्रिय : मित्राच्या नातीच्या वाढदिवसाला बंगल्यास कुलूप लावून गेल्यानंतर घटना

Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले
कोल्हापूर : कॉलनीतील मित्राच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त फुलेवाडी रिंगरोड येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर राजोपाध्येनगरातील अरविंद विश्वनाथ शेटे (वय ६५) यांचा कुलूपबंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ३४ तोळे सोने, एक किलो चार ग्रॅम चांदीचे दागिने, क्वाइन आणि सहा हजार रुपयांवर डल्ला मारला.
ऐन दिवाळीत बुधवारी रात्री आठ ते दहा या वेळेत ही घटना घडली. शेटे यांच्या फिर्यादीवरून यांची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन पथके सक्रिय केली आहेत. ३२ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अरविंद शेटे हे निवृत्त बँक अधिकारी आहेत. राजोपाध्येनगरातील साई सृष्टी अपार्टमेंटजवळील विश्व पार्वती बंगल्यात राहतात. बुधवारी ते कुटुंबीयांसह बंगल्याला कुलूप लावून कॉलनीतील मित्र अशोक केसरकर यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त फुलेवाडी रिंगरोड येथील हॉटेलमध्ये जेवण्याच्या पार्टीसाठी गेले होते.
यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील उत्तरेकडील बेडरूमच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रील कशाने तरी उचकटले. घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या भिंतीमधील लाकडी कपाट उचकटून त्यातील लहान बाळाचे सोन्या आणि चांदीचे दागिने चोरले. त्यानंतर चोरट्यांनी शेटे यांच्या बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे ३४ तोळ्यांचे दागिने, एक किलो चार ग्रॅम चांदीची दागिने लंपास केले.
दरम्यान, पार्टी संपवून शेटे घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी श्वान पथक, फिंगर प्रिंन्ट घेणाऱ्या पथकास पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केले. मात्र, अद्याप चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
जेवणाची पार्टी सुरू असतानाच...
शेटे हे सहकुटुंब जेवणाच्या पार्टीचा आनंद घेत होते. सर्वत्र दिवाळीचीही धामधूम सुरू होती. त्याचवेळी चोरट्यांनी बंगला फोडून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
काय गेले चोरीला...
- प्रत्येकी १२.५० ग्रॅम वजनाच्या चार सोन्यांच्या बांगड्या.
- सात तोळ्यांचे एक गंठण.
- पंधरा ग्रॅमचे बोरमनी नेकलेस.
- पाच ग्रॅमचे कानातील जोंधळमणी टॉप्स एक जोडी.
- प्रत्येकी वीस आणि २५ ग्रॅम वजनाचे दोन छोटे मंगळसूत्र.
- २५ ग्रॅमची एक चेन, २५ ग्रॅम वजनाची तीन पदरी सोन्याची चेन.
- १० ग्रॅमची कानातील रिंग जोडी, २० ग्रॅमच्या बिंदल्या दोन नग.
- २५ ग्रॅमच्या छोट्या बांगड्या दोन, १५ ग्रॅमच्या लहान बाळाच्या ३५ अंगठ्या .
- १५ ग्रॅमच्या ९ जोड हातातील वळी, आठ ग्रॅमच्या सोन्याचे मोठे पेंडंट.
- वीस ग्रॅम मोठ्या आकाराचे पाच पेंडट, पाच ग्रॅमचे नुरवी पेंडंट.
- चांदीचे ३०० ग्रॅम वजनाचे ५० क्वाइन्स, ५०० ग्रॅम वजनाचे २५ चांदीचे पैंजण.
- ३०० ग्रॅमच्या २५ बिंदली, दीडशे ग्रॅमचे चांदीचे तोडे, दोन वाळे आठ नग, दीडशे ग्रॅमचे चांदीचे मोठे सहा पैंजण.