Kolhapur: निवृत्त शिक्षिका पाहुण्यांकडे गेल्या; तीस तोळे दागिन्याला मुकल्या, १६ लाखांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:03 IST2025-04-25T12:02:32+5:302025-04-25T12:03:57+5:30
कदमवाडीतील साळोखे मळा येथे घरफोडी

Kolhapur: निवृत्त शिक्षिका पाहुण्यांकडे गेल्या; तीस तोळे दागिन्याला मुकल्या, १६ लाखांचा मुद्देमाल लंपास
कोल्हापूर : गडहिंग्लज येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी भिकाजीराव गायकवाड (वय ६९, रा. साळोखे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने आणि लाखाची रोकड, असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार बुधवारी (दि. २३) रात्री साडेआठ ते गुरुवारी (दि. २४) सकाळी आठच्या दरम्यान घडला. याबाबत गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षिका निलिनी गायकवाड या नातेवाइकांसह कदमवाडीतील साळोखे मळा येथील घरात राहतात. गडहिंग्लज येथील नातेवाइकांकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने घरातील सर्व जण बुधवारी रात्री गडहिंग्लजला गेले. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना त्यांच्याकडे स्वच्छता करणाऱ्या महिलेचा फोन आला. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत असून, आतील साहित्य विस्कटल्याचे दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.
चोरी झाल्याचा अंदाज येताच गायकवाड यांनी येऊन पाहणी केली असता चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतील लोखंडी कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाखाची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. गायकवाड यांनी कळवताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही.
आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला
सेवानिवृत्त शिक्षिका गायकवाड यांनी पैसे वाचवून वेळोवेळी दागिन्यांची खरेदी केली होती. ऐनवेळी गरज पडल्यास हाताशी असावेत म्हणून घरात लाखाची रोकड ठेवली होती. मात्र, चोरट्यांनी काही क्षणात आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारला.
या दागिन्यांची चोरी
पाच तोळ्यांचा राणीहार, पाच तोळ्यांच्या बिलवर बांगड्या, पाच तोळ्यांची मोहन माळ, तीन तोळ्यांच्या पाटल्या, तीन तोळ्यांची चेन, दोन तोळ्यांची सोन्याची नाणी, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, दीड तोळ्याचे वळे, सव्वातोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याच्या कानातील रिंगा, एक तोळ्याची जोंधळ मणीपोत आणि अर्धा तोळ्याचा कानातील वेल असे दागिने चोरीला गेले.
श्वान पथकाकडून माग काढण्याचा प्रयत्न
पोलिसांनी श्वान पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच सुगावा मिळाला नाही. घरामागे असलेल्या शेतातून चोरटे पसार झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. ठसे तज्ज्ञांनी घरातील वस्तूंवरील ठसे घेतले आहेत.