कोल्हापूर : कोल्हापूरसह पंढरपूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत केलेल्या दुचाकी चोरीप्रकरणी हिंगोली येथील एका सराईतासह त्याचा साथीदार आणि एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.सनी महावीर गायकवाड (वय २०, धाराशिव, ता. जि. धाराशिव) गोविंद महादेव सायगुंडे (३०, रा. परभणी, सध्या रा. युनिट नं. ४, व्यंकटेश्वरा पार्क, गडमुडशिंगी, ता. करवीर) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून आंतरजिल्ह्यातील चोरीच्या ५ लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या.जिल्ह्यात दुचाकीचोरीचे प्रकार वाढले होते. त्यांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी सनी गायकवाड (रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव) याने आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकी चोरली आहे. ते अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथकाने गुरुवारी सापळा रचून एकूण तिघांना ताब्यात घेतले. गोविंद सायगुंडे याच्याविरुद्ध हिंगोलीतील शेणगाव पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्यासह विविध गुन्हे नोंद आहेत. तो गेल्या एका वर्षापासून फरार होता. तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असून त्याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्यासह साथीदारांनी कोल्हापूरसह पंढरपूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांतून वेगवेगळ्या ठिकाणांहून आणखी काही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी गोविंद सायगुंडे, (रा. परभणी, सध्या रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याकडे ठेवल्याचे त्यांनी सांगितले. सायगुंडे याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या. चोरलेल्या दुचाकींची किंमत पाच लाख रुपये आहे.
Kolhapur: दुचाकी चोरणाऱ्या हिंगोलीच्या सराईत चोरट्यांना अटक, आठ दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:40 IST