Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:32 IST2025-10-13T15:30:51+5:302025-10-13T15:32:22+5:30
धनगरी ढोल, कैताळ यांच्या निनादात भंडारा, खोबरे, खारीक आणि लोकरीच्या मुक्त उधळणीत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर

Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक
अनिल बिरांजे
पट्टणकोडोली (जि. कोल्हापूर) : राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे नाव जगात चमकेल, सात दिवसांत पाऊस पडेल, अशी भाकणूक हजारो भाविकांच्या साक्षीने फरांडे बाबा नानादेव वाघमोडे महाराज यांनी कथन केली. धनगरी ढोल, कैताळ यांच्या निनादात भंडारा, खोबरे, खारीक आणि लोकरीच्या मुक्त उधळणीत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात रविवारपासून पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
अश्विन महिन्याच्या कोजागरी पौर्णिमेनंतर मृग नक्षत्रावर भरणाऱ्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, आदी राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. यात्रेच्या मुख्य सोहळ्यास दुपारी प्रारंभ झाला. मानकरी फरांडे बाबांनी धारदार तलवारीने अंगावर वार करून घेत हेडाम खेळण्यास सुरुवात करीत मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले.
धनगरी ढोल आणि कैताळांच्या निनादात श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत लोकर आणि भंडारा (हळद) उधळत मानाच्या छत्र्या फरांडे बाबांवरून फिरविल्या. यावेळी विठ्ठल बिरदेव मंदिरात हजारो भाविक भाकणूक ऐकण्यासाठी आले होते.
फरांडे बाबांची भाकणूक
सात दिवसांत पाऊस पडेल, रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल, मिरची, रसभांडे कडक होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल, राजकारणात उलथापालथ होईल, तसेच भगव्याचे राज्य येईल, देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल, माझ्या गुरूचे चरण जो धरेल, त्याला मी सदैव कांबळ्याखाली धरेन.
परदेशी पाहुण्यांनाही भुरळ
ग्रीस देशातून खास श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेसाठी आलेली इना या परदेशी पाहुणीला फरांडेबाबांचा फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरला नाही. इना येथील लोकसंस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.