Kolhapur Crime: महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:26 IST2025-05-20T13:22:40+5:302025-05-20T13:26:07+5:30

लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झाले होते जुळे

There was an uproar in the village after police investigation revealed that the husband had murdered his wife in Madilge kolhapur | Kolhapur Crime: महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न

Kolhapur Crime: महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न

राम मगदूम

गडहिंग्लज : मडिलगे येथील पूजा सुशांत गुरव या विवाहितेचा खून पती सुशांत यानेच केल्याचे पोलिस तपासातून उघडकीस आले. त्यामुळे मडिलगे पंचक्रोशी सुन्न झाली असून महाराज, तुम्ही हे काय केलं ? असा सवाल समस्त गावकरी विचारत आहेत.

सुशांतचे वडील सुरेश हे आचाऱ्याचे काम करायचे. त्यांच्यासोबत मदतीला जाऊन त्याने आचाऱ्याचे काम शिकले होते. त्यातूनच त्याने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. पत्नी पूजादेखील केटरिंगच्या व्यवसायात त्याला मदत करीत असे. जिद्दी व कष्टाळू दाम्पत्य म्हणून गावकऱ्यांना त्यांचे अप्रूप वाटायचे.

दरम्यान, वारकरी सांप्रदायाशी संबंध आल्याने त्याला भजन, कीर्तन व प्रवचनाचा नाद लागला. त्यानंतर तो स्वत: कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम करू लागला. त्यामुळे आचाऱ्याबरोबरच कीर्तन व प्रवचनकार म्हणूनही त्याची ओळख सर्वदूर पोहोचली.

लग्नानंतर लवकर मूलबाळ होत नसल्यामुळे त्याने पत्नीवर बारामती येथील दवाखान्यात उपचार केले. त्यानंतर त्यांना जुळे झाले. वारकरी सांप्रदायाच्या प्रभावामुळे त्याने मुलाचे नाव सोपान व मुलीचे नाव मुक्ता असे ठेवले. त्यांच्या बारशात गावजेवण घालून सुमारे ७०० लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिले होते. त्या भव्यदिव्य बाराशाची आठवण आणि ‘सोपान-मुक्ताई’च्या भवितव्याच्या चिंतेने गावकरी हळहळत आहेत.

आधी नोकरी..नंतर आचारी !

सुशांत याने ‘आयटीआय’नंतर काही वर्षे एका खासगी साखर कारखान्यात व सूतगिरणीत नोकरी केली. दरम्यान, आचारी वडिलांबरोबर त्याने उत्तम शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाकाचे कौशल्यही आत्मसात केले. त्यानंतर त्यांनी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. त्यातून ५० लोकांना रोजगारही मिळाला होता.

अतिखर्चामुळे कर्जबाजारी !

सुशांत हा निव्यर्सनी व धार्मिक होता. परंतु, आई व पत्नीवरील औषधोपचाराचा खर्च आणि चंगळवादामुळे कर्जबाजारी झाला होता. मात्र, कीर्तन-प्रवचनातून दुसऱ्यांना आनंदी जगण्याचा मार्ग दाखविताना त्याच्यासोबत सावलीसारख्या राहिलेल्या पत्नीचा खून करून त्याने सर्वांनाच धक्का दिला.

सामाजिक कार्यात पुढे

गावातील सामाजिक कार्यात तो हिरिरीने सहभागी होत असे. सार्वजनिक महाप्रसादासह गोरगरिबांच्या सुख-दु:खात आचाऱ्याचे काम विनामोबदला करायचा. अलीकडे गावातील विठ्ठल मंदिरातील हरिनाम सप्ताह त्याच्याच पुढाकाराने सुरू होता. त्यामुळे गावातील तरुणाईसह आबालवृद्धात त्याचा बोलबाला होता.

Web Title: There was an uproar in the village after police investigation revealed that the husband had murdered his wife in Madilge kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.