..तर आम्हांला फासावर लटकवले गेले असते, मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या समीर कुळकर्णींनी केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:04 IST2025-10-15T12:02:23+5:302025-10-15T12:04:20+5:30
हिंदू जनजागृती समितीतर्फे सत्कार कार्यक्रम, मुश्रीफ यांच्या पुस्तकावर बंदी घाला

..तर आम्हांला फासावर लटकवले गेले असते, मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या समीर कुळकर्णींनी केला आरोप
कोल्हापूर : जर देशविरोधी कॉंग्रेस सरकार २०१४ साली घालवले नसते तर आम्ही जिवंत राहिलो नसतो. ते सरकार गेले म्हणून आम्ही जिवंत आहोत नाही तर आम्हांला फासावर लटकवले गेले असते, असा आरोप मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या समीर कुळकर्णी यांनी केला.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोमवारी देवल क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ‘भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार, मग सत्य काय’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले मेजर उपाध्याय व कुळकर्णी, वीरेंद्र इचलकरंजीकर, विक्रम भावे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कुळकर्णी म्हणाले, सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आम्ही भोगलेले येऊ नये, अशी परिस्थिती आमच्यावर आणली गेली. जनजागरण करण्याची आम्ही भूमिका घेतली आहे. हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्राचे संघटक सुनील घनवट म्हणाले, देशात १९९०च्या सुमारास जिहादी आतंकवाद सुरू झाला. हा आतंकवाद झाकण्यासाठीच भगवा आतंकवाद पुढे आणण्याचे षडयंत्र रचण्यात आले.
मुश्रीफ यांच्या पुस्तकावर बंदी घाला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मुंबईत अतिरेकी हल्ल्यावेळी डाव साधत करकरे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना ठार केले, अशी मांडणी करणाऱ्या शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठीच्या तक्रारी देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.