वडिलांचा अपघाती मृत्यू झाला, आईचा जगण्याचा सूरच हरवला; अन् चक्क मुलानेच आईचा पुनर्विवाह घडविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:17 IST2023-01-17T18:16:20+5:302023-01-17T18:17:52+5:30
युवराज शेले या तरुणाने विधवा आईच्या पुनर्विवाहाचे पाऊल उचलून कोल्हापूरचे पुरोगामीत्व अधिक घट्ट केले.

वडिलांचा अपघाती मृत्यू झाला, आईचा जगण्याचा सूरच हरवला; अन् चक्क मुलानेच आईचा पुनर्विवाह घडविला
कोल्हापूर : सामाजिक सुधारणेत आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात तरुणाने आपल्या विधवा आईचा पुनर्विवाह घडविला. ४५ वर्षे वयाच्या आईची उर्वरित आयुष्यात पतीविना फरफट होऊ नये, या उदात्त हेतूने मुलानेच पुढाकार घेऊन घडवून आणलेला हा विवाह सध्या कोल्हापुरात चर्चेत आहे. या पुनर्विवाहाने कोल्हापूरच्या सामाजिक सुधारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले.
युवराज नारायण शेले (वय २३) हा तरुण शिंगणापूर (ता. करवीर) येथील चंबुखडी परिसरात राहतो. त्याचे वडील सेंट्रिंग कामगार होते. गेल्यावर्षी रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यासाठी घरातून बाहेर गेलेल्या त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्या घटनेचा या कुटुंबावर मोठा आघात झाला. पतीच्या निधनानंतर युवराजची आई रत्नाबाईच्या जगण्याचा सूरच हरवला होता. बारावी शिकलेला युवराज आईला दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. कामाच्या निमित्ताने वारंवार घराबाहेर जाणाऱ्या युवराजला आईची चिंता वाटत होती. त्यातून त्याला आईच्या पुनर्विवाहाची कल्पना सुचली.
चंबुखडी परिसरातच राहणारे नात्यातील घटस्फोटीत मारुती व्हटकर यांना युवराजने पुनर्विवाहाबद्दल विचारणा केली. त्यांनी होकार दर्शविताच युवराजने आपल्या आईकडे पुनर्विवाहाचा आग्रह धरला. सुरुवातीला आईने युवराजचे म्हणणे धुडकावून लागले. लोक काय म्हणतील, असे म्हणत तिने एकाकी आयुष्य काढू, असे सांगितले. मात्र, अखेर मुलाचा आग्रह मान्य करीत ती पुनर्विवाहासाठी तयार झाली. युवराजने पुढाकार घेऊन लग्नाची तयारी केली आणि चंबुखडी येथे १२ जानेवारीला लग्नाचा छोटेखानी समारंभ झाला. या लग्नाने रूढी-परंपरांची जळमटे हटवून समाजाला नवा संदेश दिला.
विधवा प्रथाबंदीनंतरचे पुढचे पाऊल
शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने गेल्यावर्षी विधवा प्रथाबंदीचा ठराव केला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी त्याचे अनुकरण करून विधवांना सन्मान देण्यास सुरुवात केली. आता युवराज शेले या तरुणाने विधवा आईच्या पुनर्विवाहाचे पाऊल उचलून कोल्हापूरचे पुरोगामीत्व अधिक घट्ट केले.
पत्नीचे निधन झाल्यानंतर पुरुष दुसरे लग्न करतात, तर मग पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने दुसरा विवाह करणे चुकीचे नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आईने उरलेले आयुष्य पांढऱ्या कपाळाने घालवणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मी तिच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेतला.- युवराज शेले