चार कोटी खर्चून कोल्हापुरातील हॉकी मैदानाचा देखावा, खेळाडूंना अॅस्ट्रो टर्फवर सराव करण्यात अडचणी
By भारत चव्हाण | Updated: July 18, 2025 15:58 IST2025-07-18T15:57:56+5:302025-07-18T15:58:37+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची स्थानिक खेळाडूंची इच्छा अपूर्ण

छाया-आदित्य वेल्हाळ
भारत चव्हाण
कोल्हापूर : जिल्ह्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध करणारे असंख्य हॉकीपट्टू दिले, त्याची दखल घेत केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ अंतर्गत कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम मंजूर केले. त्याकरिता साडेसात कोटींचा निधीही मंजूर केला, परंतु मंजूर केलेल्या निधीतील काही निधी मिळाला नसल्याने कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे हॉकी स्टेडियमवर सराव, तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची स्थानिक खेळाडूंची इच्छा अपूर्ण राहिली आहे.
जिल्ह्याला कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी या खेळांबरोबरच हॉकीचीदेखील मोठी परंपरा लाभली आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात हॉकीचे चांगलेच आकर्षण आहे. या आकर्षणातून शालेयस्तरावरच खेळाडू तयार होत आहेत. शालेय, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरून राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आजही फुटबॉल खालोखाल हॉकीच्या खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, या सर्व खेळाडूंना साध्या मैदानावर खेळायची सवय आहे, ॲस्ट्रो टर्फवर खेळण्याचा अनुभव नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच जागतिक स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी कोल्हापूर परिसरातील खेळाडूंना मिळावी या हेतूने हॉकी प्रशिक्षक विजय साळोखे सरदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ॲस्ट्रोटर्फचे एक अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचा निर्णय कोल्हापूर महापालिका प्रशासनाने घेतला. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’कडे पाठविला. हॉकी स्टेडियमसाठी महापालिकेने सहा एकरची जागा राखीव ठेवल्यामुळे या प्रस्तावाला लागलीच मान्यता देण्यात आली.
माजी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रक्रिया पार पाडण्यात मदत झाली. केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’मधून साडेसात कोटींचा निधी दिला. मंजूर रकमेपैकी चार कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाकडे वर्ग झाला. त्यामुळे कामालाही लागलीच सुरुवात झाली. परंतु पुढचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित कामे रखडली आहेत. त्यामुळे ॲस्ट्रो टर्फ टाकूनदेखील खेळाडूंना सराव करण्यात अडचणी येत आहेत.
- हॉकी स्टेडियमसाठी मंजूर निधी - ७.५० कोटी
- आतापर्यंत प्राप्त निधी केवळ - ४ कोटी
- महापालिका येणे निधी - १.५० कोटी
- केंद्र सरकारकडून येणे निधी - १.५० कोटी
दोन एकरांत वसतिगृहाची आवश्यकता
हॉकी मैदानासाठी सहा एकर जागा आरक्षित आहे. त्यापैकी चार एकरांत सुसज्ज मैदान आणि दोन एकरांत खेळाडूंसाठी वसतिगृह अशी संकल्पना आहे. परंतु वसतिगृहाचा प्रस्तावदेखील तयार झालेला नाही.
मैदान अपूर्ण असल्यामुळे आम्ही जिल्हा, विभागीय, तसेच राज्य स्तरीय स्पर्धांची मागणी करूनदेखील त्या घेता येत नाहीत. सीसीटीव्ही, रंगरंगोटी, गोलपोस्ट, पंच रेस्टरूम अशी काही किरकोळ कामे निधीअभावी मागे राहिली आहेत. - विजय साळोखे, प्रशिक्षक