खुशखबर!, प्रलंबित पीकविमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा, कोल्हापूर जिल्ह्यात लाभार्थी अन् किती कोटी मिळणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:54 IST2025-04-19T17:50:45+5:302025-04-19T17:54:14+5:30
आयुब मुल्ला खोची : एक रुपयात पीकविमा उतरलेल्या शेतकऱ्यांना खरिपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी ...

खुशखबर!, प्रलंबित पीकविमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा, कोल्हापूर जिल्ह्यात लाभार्थी अन् किती कोटी मिळणार.. जाणून घ्या
आयुब मुल्ला
खोची : एक रुपयात पीकविमा उतरलेल्या शेतकऱ्यांना खरिपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर ८ हजार ८८३ शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख ७६ हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.
शासनाने आपल्या हिश्श्याची रक्कम अदा करण्यास उशीर लावला. त्यामुळे भरपाईची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सर्वांत जास्त २ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांची भरपाई शिरोळ तालुक्यातील २ हजार ४९२ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीकविमा उतरण्याच्या उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला. शेतकऱ्यांमध्ये यासाठी जागृती व्हावी, याचा गतिमान प्रयत्न कृषी विभागाने केला. त्यास हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा असेल तरच भरपाईचा मार्ग सुकर झाला. त्याप्रमाणे संख्या मोठी नसेल. पण, ज्यांचे नुकसान झाले त्यांना मात्र नुकसानीचे पैसे मिळू लागले आहेत.
खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा एक रुपयात विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोबरअखेर उतरला. त्यानंतर काही ठिकाणी महापूर, नैसर्गिक आपत्ती यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले. याची कल्पना ७२ तासांत संबंधित विभागाला कळविण्यात आली. त्यामुळे तत्काळ पंचनामे सुरू झाले. गावोगावच्या कृषी सहायकांना सोबत घेत विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानभरपाईचे पंचनामे केले.
त्याची माहिती संबंधित विभागाला ऑनलाइन कळविण्यात आली; परंतु हंगाम संपून सहा महिने होत आले तरी भरपाईची रक्कम मिळण्यास वेळच होत गेला. कृषी विभाग, विमा कंपन्यांकडे चौकशी करून शेतकरी थकला. गेल्या आठवड्यात शासनाकडून थकीत असलेला हप्ता अदा झाला. त्यामुळे तत्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख ७६ हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१०० टक्के नुकसान झाल्यास विमा संरक्षित मिळणारी रक्कम हेक्टरी पुढीलप्रमाणे आहे. सोयाबीन (४९ हजार), भुईमूग (३८ हजार), ज्वारी (२८ हजार), भात (४२ हजार). नाचणी (२७ हजार).
तालुकानिहाय शेतकरी व रक्कम
तालुका - शेतकरी - रक्कम
शिरोळ - २ हजार ४९२ - २ कोटी ६९ लाख ६३ हजार
हातकणंगले - १ हजार ४२१ -१ कोटी ५३ लाख ४७ हजार
चंदगड - १ हजार ८०९ - १ कोटी ५ लाख ३१ हजार
कागल- ६८०- ८५ लाख ७५ हजार ४२३
गडहिंग्लज - ५९० - ५१ लाख ४० हजार ८४८
राधानगरी - ४९९ -६८ लाख ३६ हजार ५८५
पन्हाळा - ४५१ - ३३ लाख ३७ हजार ६७१
करवीर - ३४६ - ३२ लाख ८८ हजार ९६
शाहूवाडी - २६४ - १० लाख ४३ हजार ७४३
आजरा - २०८ - ३८ लाख ३८ हजार
भुदरगड १२१ - २१ लाख ८६ हजार ४८५
हवामान बदलामुळे उत्पादनामधील जोखीम दिवसेंदिवस वाढत असून, ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षातील खरीप हंगमासाठी पीकविमा उतरवला आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना विम्यामुळे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण होण्यास निश्चित मदत झाली. - नामदेव परीट, कृषी उपसंचालक