शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्यास आजपासून प्रारंभ, दशमहाविद्या स्वरूपात दिसणार अंबाबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:47 IST2025-09-22T12:47:14+5:302025-09-22T12:47:29+5:30

घटस्थापना आज 

The vibrant celebrations of Sharadiya Navratri festival begin from today, Ambabai will be seen in the form of Dasha Mahavidya | शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्यास आजपासून प्रारंभ, दशमहाविद्या स्वरूपात दिसणार अंबाबाई

शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्यास आजपासून प्रारंभ, दशमहाविद्या स्वरूपात दिसणार अंबाबाई

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे व घरोघरी सोमवारी घटस्थापना करून शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यावर्षी आश्विन शुद्ध तृतीया या तिथीत वृद्धी झाल्याने उत्सव दहा दिवस साजरा केला जाणार आहे. या काळात अंबाबाईची पूजा दशमहाविद्यांपैकी ७ स्वरूपात बांधण्यात येणार आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवारी (दि. २२) सकाळी ६.३० वाजता देवीची नित्य पूजाभिषेक होईल, त्यानंतर ७.३० वाजता देवीचे पारंपरिक श्रीपूजक मुनिश्वर कुटुंबीयांकडून अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात मंगल वाद्यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी होईल. घटस्थापना झाल्यानंतर जाधव घराण्याकडून सकाळी ९ वाजता तोफेची सलामी दिली जाईल.

त्यानंतर अंबाबाईची महापूजा पार पडेल. अंबाबाईची उत्सवमूर्ती सनई-ताशांच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान करण्यात येईल आणि ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. मंत्रोच्चारांमध्ये घटस्थापनेची महापूजा झाल्यानंतर मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत.

नवरात्रकाळात रोज तीनवेळा अभिषेक आणि पाचवेळा आरती करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या उत्सव काळात अंबाबाईची रोज विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. रोज रात्री अंबाबाईचा पालखी सोहळा शाही लवाजम्यासह संपन्न होईल. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला देवीची पारंपरिक बैठी पूजा बांधली जाते.

आज, सोमवारी श्री कमलादेवी, मंगळवारी श्री बगलामुखी, बुधवारी तारा, गुरुवारी मातंगी, शुक्रवारी भुवनेश्वरी, शनिवारी अंबारीतील पूजा, रविवारी षोडशी त्रिपुरसुंदरी, सोमवारी (दि. २९) महाकाली, मंगळवारी महिषासुरमर्दिनी, बुधवारी भैरवी आणि गुरुवारी रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे.

नवरात्रौत्सव काळात अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी ललिता पंचमी दिवशी केला जाणार आहे, तर अष्टमीला देवीच्या पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. नवमीला खंडेपूजन व विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे.

घटस्थापनेसाठी मुहूर्त

शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात होणाऱ्या घटस्थापनेसाठी सोमवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. नवरात्रकाळात ललिता पंचमी, महालक्ष्मीची घागर फुंकणे, अष्टमीचा जागर, नवमीचे खंडेपूजन व दसरा यादिवशी कुलदेवतेचे पारंपरिक विधी प्रथेनुसार करावेत, असे आवाहन अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी केले आहे.

शिवाजी चौकात आजपासून सोंगी भजन स्पर्धा

शिवाजी चौक शारदीय नवरात्र उत्सव सोंगी भजन स्पर्धेचे आज, सोमवार पासून आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता बसवराज आजरी, आशिष अंगठी यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा १ ऑक्टोबर पर्यंत रात्री आठ ते बारा या वेळेत होणार आहेत. आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती नवरात्रौत्सव कमिटीचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.

नवरात्रात भाविकांसाठी अन्नछत्र, धर्मशाळा सज्ज

नवरात्रौत्सवात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोफत भोजनप्रसाद देण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सज्ज झाले आहे. गेली १७ वर्षे कोल्हापूरमध्ये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांना रोज मसाले भात, आमटी, भाजी, गव्हाची खीर व ताक असा मोफत भोजनप्रसाद दिला जातो.

अंबाबाई मंदिर परिसरात ४०० पोलिसांची नजर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बंदोबस्तासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. नवरात्रौत्सव काळात भाविकांच्या वाहनांसाठी शहरात २४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून, सर्व पार्किंग ठिकाणे सुविधांनी सज्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The vibrant celebrations of Sharadiya Navratri festival begin from today, Ambabai will be seen in the form of Dasha Mahavidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.